भूपाळी, गौळणी, विठ्ठलाची गाणी, लावणी, कव्वाली, हिंदी-मराठी गाण्यांची रसिकांना मेजवानी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भूपाळी, गौळणी, विठ्ठलाची गाणी, लावणी, कव्वाली, हिंदी-मराठी गाण्यांची रसिकांना मेजवानी मिळाली. निमित्त होते पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘सूरमयी दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे.
नवी सांगवीतील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात आयोजित दिवाळी पहाटच्या तिसऱ्या दिवशी ‘संतवाणी ते लोकगीते व लावणी’ कार्यक्रमात सांगवी-पिंपळे गुरवकरांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. उत्साहपूर्ण वातावरणात गायक चंद्रकांत शिंदे, गायिका वर्षा एखंडे, गायिका राजेश्वरी पवार, गायक चित्रसेन भवार या कलाकारांनी सादर केलेल्या उत्कृष्ट जुन्या, नव्या सुरेल गाण्यांमुळे ही ‘दिवाळी पहाट’ रसिकांसाठी अविस्मरणीय ठरली. यावेळी आमदार शंकर जगताप, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, अप्पासाहेब रेणुसे, उद्योजक विजय जगताप, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, सुरेश भोईर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, संतोष महाराज पायगुडे, निवृत्ती बोरकर महाराज, शेखर महाराज जांभुळकर, शिवानंद स्वामी महाराज, वारकरी महामंडळाचे शहराध्यक्ष विजूअण्णा जगताप, ऍड. अभिषेक जगताप, राजू सावळे, तानाजी जवळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
चंद्रकांत शिंदे यांनी ‘नवीन हे वर्ष सुखाचे जावो’, ‘विठ्ठलच्या पायी वीट झाली मऊ’, ‘सोन्याचं बाशिंग, लगीन देवाचं लागतं’, ‘चल गं सखे, चल गं सखे पंढरीला’ अशी गीते आपल्या शिंदेशाही आवाजात सादर करीत रसिकांची वाहवा मिळवली. ‘उड जाये एकदिन पंछी, रहेगा पिंजरा खाली’ या कव्वालीने सभागृह अक्षरशः डोक्यावर घेतले. ‘खंडेरायाच वेड लागलं मुरुळीला’ गीताने सभागृह भारावून टाकले.
गायिका वर्षा एखंडे यांनी ‘मेरे झोपडी में प्रभू श्रीराम’, ‘पाण्याला जाते पाणी घेऊन येते’, ‘तुझ्यासाठी आली बनात’ ही गौळण, ‘मुजरा मानाचा जिजाईला’ गीतांसोबतच ‘बाई मी लाडाची गं लाडाची’ गौळण गात रसिकांना मंत्रमुग्ध केले. रसिकांनी टाळ्या शिट्ट्याची उधळण करीत मनमुराद आनंद लुटला.
राजेश्वरी पवार यांनी ‘बाहो में चले आ’, ‘मोरनी बागा में बोली’ अशी गीते व लावणी गात रसिकांवर मोहिनी घातली. चित्रसेन भवार यांच्या ‘उठी उठी गोपाळा भूपाळीने कार्यक्रमाची सुरुवात केली. ‘जीवाशिवाची बैलजोडी’ गाण्याने सभागृह भारावून टाकले. राजेश्वरी व चित्रसेन यांनी ‘गोमू संगतीनं’ या गायलेल्या गाण्याला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. कीबोर्ड’ वर संतोष खंडागळे, सुनील गायकवाड, ढोलकीवर निलेश देवकुळे यांनी, तबल्यावर गोविंद कुडाळकर यांनी साथ संगत केली.
सुप्रसिद्ध निवेदक योगेश सुपेकर यांच्या निवेदनाने रसिकांना मनमुरादपणे हसायला भाग पाडले. दरम्यान, विजय उलपे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
आमदार शंकर जगताप यांनी केले गायकांचे कौतुक :
आमदार शंकर जगताप यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहत गायक गायिकांचे कौतुक केले. दिवाळी पहाट कार्यक्रमामुळे समाज एकसंध राहण्यास मदत होते. कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान गेली १७ वर्षे आयोजित करीत असलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाबद्दलही कौतुक केले.













