इंद्रायणी तांदळाच्या बियाण्यांच्या तुटवड्यावर विधानसभेत आवाज – आमदार सुनील शेळके यांची सरकारकडे ठोस उपायांची मागणी

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके यांनी आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न ठामपणे मांडत सरकारला जाब विचारला. मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या इंद्रायणी तांदळाच्या लागवडीसाठी लागणाऱ्या बियाण्यांचा तुटवडा गंभीर होत चालल्याने त्यांनी तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली.
मावळमध्ये सुमारे १२,८६५ हेक्टर क्षेत्रावर इंद्रायणी तांदळाची लागवड केली जाते. मात्र, या वर्षी उच्च प्रतीच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. कृषी विद्यापीठाकडे वारंवार मागणी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही, असा आरोप करत शेळके यांनी शासनाच्या दुर्लक्षावर जोरदार टीका केली.
“राज्याबाहेर बियाण्यांची विक्री करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. हे थांबवायला हवं. शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दरात बियाणे मिळणे हे त्यांचा हक्क आहे. यासाठी सशक्त यंत्रणा उभारायला हवी,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
त्यांनी पुढे अशी मागणी केली की, बियाण्यांच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी कार्यवाही केली जावी.,स्थानिक कृषी संस्था आणि सहकारी संघटनांना थेट बियाणे पुरवठा करावा.,जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत वेळेत व विश्वासार्ह बियाण्यांचा पुरवठा सुनिश्चित करता येईल.
शेतकऱ्यांच्या हितासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज अधोरेखित करत, “शेतकऱ्यांचं भविष्य सुरक्षित करणं हीच खरी जबाबदारी आहे,” असे मत शेळके यांनी अधिवेशनात ठासून मांडले.
शेळके यांनी यापूर्वीही सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला आहे.












