ताज्या घडामोडीपिंपरीसांस्कृतिक
इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत, ‘गाता रहे मेरा दिल’च्या बिग बी मैफलीला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत ‘गाता रहे मेरा दिल’च्या २८व्या संगीतपर्वात या शतकातील महानायक असे गौरवोद्गार ज्यांच्याबद्दल काढले जातात त्या ‘बिग बी’ अर्थातच अमिताभ बच्चन यांच्यावरील निवडक गाण्यांच्या सांगीतिक मैफलीला रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.
निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात (छोटे सभागृह) रविवार, दिनांक ०६ जुलै २०२५ रोजी राखी झोपे यांची निर्मिती संकल्पना आणि अनिल झोपे यांच्या उत्तम अशा संयोजनातून या विशेष सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते हिरामण राठोड,दिलीप काकडे, जयराम शर्मा, किरण वाघेरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आषाढी एकादशीनिमित्त अभंग आणि ‘कानडा राजा पंढरीचा…’ या भक्तिरचनेने मैफलीचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्यावरील एका भावपूर्ण कवितेचे सुंदर अभिवाचन करण्यात आले. विजय किल्लेदार, भारती किल्लेदार, अनिल झोपे शामकुमार माने, वैशाली रावळ, मनोज येवले, तरुण कुमार, श्रीया दास, अदिती खटावकर, माधवी पोद्दार, पंकज श्रीवास्तव, राजेंद्र गावडे, दीपक निस्ताने, संदीप पाचारणे, विवेक सोनार, डॉ. गणेश अंबिके आणि अमित पांचाळ या गायक कलाकारांनी आपल्या एकल आणि युगुलस्वरातील सादरीकरणातून अमिताभ यांच्यावर चित्रीत झालेल्या वेगवेगळ्या मूडस् मधील गाण्यांचे अप्रतिम सादरीकरण करीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. जवळपास प्रत्येक गाण्याला वन्स मोअरची दाद मिळत असल्याने गायक कलाकारांनी जीव ओतून सादरीकरण केले.
‘छू कर मेरे मनको…’ , ‘कब के बिछडे…, ‘कभी कभी मेरे…’ , ‘देखा एक ख्वाब तो…’ , ‘ओ साथी रे…’ , ‘जाने कैसे कब कहाँ…, ‘निला आसमाँ…’ , ‘तुम भी चलो…’ , ‘मंजिले अपनी जगहा…’ , ‘प्यार में दिल पे…’ , ‘तेरे मेरे मिलन की…’ , ‘रिमझिम गिरे सावन…’ , ‘आज रपट जाये तो…’ , ‘एक रोज मैं तडप कर…’ , ‘आती रहेगी बहारे…’ , ‘आदमी जो कहेता हैं…’ , ‘सारा जमाना…’ , ‘दिल्लगी ने दी हवाँ…’ , ‘बने चाहे दुष्मन…’ , ‘समदंर में नहाके…’ , ‘सलाम – ए – इश्क…’ अशा एकाहून एक सरस गीतांनी मैफल रंगली असतानाच ‘डॉन’ या चित्रपटाच्या शीर्षकगीताचे सादरीकरण एवढे दमदार होते की, श्रोत्यांनी उत्स्फूर्तपणे नाच करून त्याला प्रतिसाद दिला. ‘आदमी जो कहेता हैं…’ हे शीळ वाजवून सादर केलेले गीत रसिकांना भावले; तर ‘मच गया शोर सारी नगरी में…’ चा आनंद रसिकांनी शिट्या – टाळ्यांच्या गजरात लुटला. वास्तवात पती – पत्नी असलेल्या किल्लेदार दांपत्याने सादर केलेले ‘परदेसीयाँ…’ या युगुलस्वरातील गीताने मैफलीला सफलतेचा आयाम प्राप्त करून दिला. ‘ना ना नाना रे…’ या द्वंद्वगीताच्या जोशपूर्ण सादरीकरणाने मैफलीचा समारोप करण्यात आला. इंडियन म्युझिकल क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी संजय, दीपक, प्रशांत, निखिल संयोजनात परिश्रम घेतले. अमित पांचाळ यांनी अतिशय सुंदर असे निवेदन केले.













