उन्नतीच्या इको-फ्रेंडली गणेशा कार्यशाळेला लहानग्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपळे सौदागर परिसरात उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “इको-फ्रेंडली श्री गणेशा कार्यशाळेला” लहान मुलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवारी सकाळी उन्नतीच्या कार्यालयाच्या आवारात पार पडलेल्या या उपक्रमात तब्बल चारशेहून अधिक मुलांनी सहभागी होऊन शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती स्वतःच्या हातांनी घडविल्या.
गेल्या पाच वर्षांपासून उन्नतीकडून हा उपक्रम सातत्याने राबविला जात असून यंदाही मुलांच्या कल्पकतेला व कलागुणांना वाव मिळाला. कार्यशाळेत वैष्णवी शेगावकर यांनी गणेशमूर्ती तयार करण्याचे मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे मुलांसोबत काही पालकांनीही उत्साहाने सहभाग घेत गणपतीच्या मूर्ती तयार केल्या.
उपक्रमाबाबत बोलताना उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे म्हणाल्या, “लहान मुलांमध्ये कलागुणांचा विकास घडवून आणणे तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देणे हा या उपक्रमामागचा हेतू आहे. व्यक्तिमत्त्व विकासासोबतच पर्यावरण संवर्धनाची जाणीव मुलांमध्ये लहानपणापासून रुजावी हीच आमची धडपड आहे.”
या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन उन्नतीचे संस्थापक संजय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. कार्यशाळेच्या यशासाठी उन्नती सखी मंचच्या प्रमुख रश्मी मोरे तसेच रमेश वाणी, बाळकृष्ण चौधरी, सखाराम ढाकणे, योगिता नाशिककर आदींनी परिश्रम घेतले.















