चिखली येथे हिंदू मिलन समारंभ संपन्न

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुदळवाडी, ता. हवेली (जि. पुणे) येथील चंद्रभागा लॉन्समध्ये हिंदू मिलन समारंभाचे भव्य आयोजन करण्यात आले. समाजातील एकता, बांधिलकी आणि परस्पर सलोखा वृद्धिंगत करण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून हिंदू युवा वाहिनी प्रदेश प्रभारी व उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी आमदार श्री. राघवेंद्र प्रताप सिंह यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून समाजातील ऐक्य, परस्पर सहकार्य आणि नव्या पिढीला योग्य दिशा देण्याचे महत्व अधोरेखित केले. समाजातील विविध प्रश्नांवर त्यांनी प्रकाश टाकत एकत्रितपणे सामाजिक कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला उत्तर भारतीय समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थित नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान व उत्साह दिसून येत होता. एकत्र येऊन समाजाच्या हितासाठी काम करण्याची भावना या सोहळ्याच्या माध्यमातून प्रकर्षाने दिसून आली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक मंडळ, ग्रामस्थ तसेच विविध मान्यवरांचे विशेष प्रयत्न लाभले. समाजातील बांधवांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद व आपुलकीमुळे कार्यक्रमाला एक वेगळेच स्वरूप प्राप्त झाले.
या सोहळ्यात उपस्थित मान्यवर, कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.















