अध्यात्म व विज्ञानाच्या विचारांचा समन्वय म्हणजे ‘नवा भारत’ पद्मभूषण डॉ. विजय भटकर
‘महाराष्ट्र वारकरी किर्तनकार गोलमेज परिषदे’ चा समारोप

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) : विज्ञान व अध्यात्माच्या एकत्रीकरणातून नव्या विचारांचा समन्वय होईल, आणि या दोन्हीच्या विचारांचा समन्वय म्हणजे नवा भारत असेल. पंतप्रधान सतत म्हणतात की भारत एक महान व चांगले राष्ट्र होणार आहे. याची सुरूवात ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदे’तून झाली आहे. भारतीय राजकारणाला बदलावयाचे असेल तर अध्यात्मिक विचार मांडले गेले पाहिजे. येथून निघालेले मंथन हे भारतीय संस्कृतीला नवी दिशा देण्यासाठी सज्ज आहे.” असे विचार जागतिक किर्तीचे संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.
‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ एज्युकेशन, पुणे’ व ‘एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसद’ यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमानवाडी आळंदी (देवाची) येथील डॉ. विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस स्कूल येथे आयोजित दोन दिवसीय ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदे’ च्या समारोप समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी पंढरपूर येथील श्रीगुरू साखरे महाराज परंपरा पाईकचे हभप रामकृष्ण महाराज वीर, आळंदी येथील साधकाश्रमचे प्रमुख हभप यशोधन महाराज साखरे, बदलापूर येथील ज्येष्ठ कीर्तनकार हभप विश्वनाथ महाराज वारिंगे, देहूचे हभप पांडुरंग महाराज घुले, पंडित उद्धवबापू आपेगावकर, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आदी सन्माननीय उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड होते. पद्मश्री पोपटराव पवार व परिषदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील उपस्थित होते.
डॉ. विजय भटकर म्हणाले,” राजकारणाला अध्यात्मिक कल कसा मिळू शकेल यावर महात्मा गांधीजी सतत विचार मांडत होते. पण या परिषदेच्या माध्यमातून यांची सुरूवात झाली आहे. येथील राजकारणाला आध्यात्मिक कसे करता येईल हे सर्वात मोठे परिवर्तन असेल. राजकारणाला स्वच्छ करण्यासाठी अशा प्रकारच्या गोलमेज परिषदेचे आयोजन होणे अत्यंत गरजेचे आहे. भारताला स्वातंत्र्य कसे आणि कोणत्या पद्धतीने मिळावे या साठी ब्रिटीशकाळात गोलमेज परिषदेला अतिशय महत्व आले होते. ही परिषद लंडन ला भरणार होती आणि येथे हे विचार मांडले जाणार होते. त्याच प्रमाणे ही परिषद देशासाठी अत्यंत महत्वाची आहे.”
डॉ. सदानंद मोरे म्हणाले,” समाजात प्रबोधनाचे सामर्थ्यशाली माध्यम कीर्तन आहे. कीर्तनकार प्रबोधनाच्या माध्यमातून सर्व जातीचे कांगोरे कमी करण्याचे प्रयत्न करीत असतो. या परिषदेत वारकरी शिक्षण संस्थेबद्दल जी चर्चा झाली त्यानुसार आता त्यांना व्यावसायिक कार्याचे प्रशिक्षण देणे काळाची गरज आहे. वारकरी संप्रदायात शिस्तबद्ध आणि ज्यांना व्हिजन आहे अश्या लोकांची खूप गरज आहे. या संप्रदायाने आता मिशन ठेऊन मार्गावर चालावे.”
डॉ. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,” ऐतिहासिक परिषदेतून असे सरपंच आणि महाराज तयार व्हावे जेणे करून देशात परिवर्तनाची लाट आली पाहिजे. जीथे अध्यात्माचा बेस असतो तेथे विकास असतोच. त्याच प्रकारे राजकारणात चारित्र्यवान लोक निर्माण करण्यासाठी भारतातील पहिली एसओजी संस्थेची निर्मिती केली आहे. आज याच माध्यमातून राज्यात दोन आमदार व देशात ८ आमदार निवडून आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी नव नवीन प्रयोग सातत्याने राबविले जात आहे.”
यशोधन महाराज सारखे म्हणाले,” वारकरी संप्रदाय हा परोपकारी संप्रदाय आहे. कीर्तनकारांनी आपल्या आचरणातून आदर्श निर्माण करावा. या परिषदेतून समोर आलेल्या वेगवेगळ्या समस्यांच्या समाधानांचे निराकरण करण्यासाठी संतांनी सांगितलेल्या विचारांवर विचार विमर्श करावा लागेल. तसेच सामाजिक समस्यांसाठी वारकरी संप्रदायाने विचार करावा. ”
हभप रामकृष्ण महाराज वीर महाराज आणि विश्वनाथ महाराज वारिंगे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, समाजाला खरी दिशा देण्याचे कार्य केवळ वारकरी संप्रदाय आणि सरपंच करू शकतात. वारकरी संप्रदाय हा विश्वधर्मी असून स्वामी विवेकानंदाच्या स्वप्नातील भारत निर्मितीच्या कार्यात अनमोल वाटा असेल. कल्याणाची आणि विकासाची मुळ कल्पना घेऊन वारकरी संप्रदायाने मानवी मूल्यांचे मुळ तत्व धरून कार्य करीत आहेत. सूत्रसंचालन डॉ. शलिनी टोणपे यांनी केले. योगेश पाटील यांनी आभार मानले.













