देशभक्तीच्या रंगात रंगला ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलचा ७९वा स्वातंत्र्यदिन सोहळा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलचा परिसर १५ ऑगस्टला देशभक्तीच्या गीतांनी आणि तिरंग्याच्या अभिमानाने दुमदुमून गेला. ७९वा स्वातंत्र्यदिन शाळेत उत्साहात, जल्लोषात व संस्कारमय वातावरणात साजरा करण्यात आला.
या विशेष प्रसंगी शाळेला डीआरडीओचे शास्त्रज्ञ डॉ. सुनील दहीवळे, भारतीय नौदलातील अधिकारी श्री. आनंद काकडे, भारतीय थलसेनेतील ए.एस.ओ. सोमनाथ गोरे तसेच विश्वस्त डॉ. अशोककुमार पगारिया यांची मान्यवर उपस्थिती लाभली. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रीय सेवेसाठी नवचैतन्य निर्माण झाले.
सोहळ्याची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भारतातील विविधतेचे दर्शन घडवणारे लोकनृत्य, हृदयस्पर्शी देशभक्तिपर गीते आणि प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांच्या डोळ्यांत देशप्रेमाची ज्वाला प्रज्वलित केली.
शाळेतील शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात चमक दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, पदके आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. क्रिकेट व बुद्धिबळातील जिल्हास्तरीय विजेत्यांचा विशेष सन्मान सोहळ्यात रंगत आणणारा ठरला.
लायन्स क्लब ऑफ निगडीचे अध्यक्षा सौ रश्मी नायर व सदस्यांनीही कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. क्लब तर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
समारोप प्रसंगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ललितकुमार धोका, मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. स्वप्नाली धोका व मुख्याध्यापिका श्रीमती अल्पना मोहंता यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश देत भारतीय सेनेच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. उपस्थितांनी “स्वातंत्र्य, एकता व प्रामाणिकतेच्या मूल्यांचे जतन करण्याची” सामूहिक शपथ घेतली.
हा भव्य सोहळा विद्यार्थ्यांसाठी केवळ उत्सव ठरला नाही तर राष्ट्राभिमानाची नवी ज्योत चेतवणारा, उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देणारा अविस्मरणीय क्षण ठरला.













