चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

‘औपचारिक शिक्षणापेक्षा पारंपरिक शिक्षण महत्त्वाचे!’ – पद्मश्री गिरीश प्रभुणे

Spread the love

 

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) ‘औपचारिक शिक्षणापेक्षा पारंपरिक शिक्षण महत्त्वाचे असते!’ असे विचार ज्येष्ठ समाजसुधारक, साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी चिंचवडगाव येथे  व्यक्त केले.

कलारंजन प्रतिष्ठान आयोजित गुरुगौरव पुरस्कार समारंभात गिरीश प्रभुणे बोलत होते. महाराष्ट्र राज्य ग्रंथालयाचे सेवानिवृत्त उपसंचालक बाबुराव हंद्राळे अध्यक्षस्थानी होते; तसेच सेवानिवृत्त उपप्राचार्या सुरेखा कटारिया, सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष जगन्नाथ नेरकर, कलारंजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले, कार्यवाह शिरीष पडवळ यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

गुरुपौर्णिमेनिमित्त कलारंजन प्रतिष्ठानच्या वतीने पांडुरंग भुजबळ (सुमारे पन्नास हजार वृक्षांचे रोपण), दिलीप ससाणे (सुमारे तीस वर्षांपासून वैदू वस्तीत संस्कार वर्गाच्या माध्यमातून अध्यापन) आणि संपत पोटघन (कुदळवाडी येथील पी सी एम सी पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक) यांना गुरुगौरव विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सावता गिड्डे, शामल दौंडकर, करुणा परबत, शुभांगी राजे, प्रज्ञा देशपांडे, हर्षाली टाव्हरे, कृतिका काळे आणि संगीता गिरी यांना सन्मानित करण्यात आले.

गिरीश प्रभुणे पुढे म्हणाले की, ‘प्राचीन भारत हा ज्ञानसंपन्न होता. त्यामुळे जगातील विविध देशांमधून ज्ञान संपादन करण्यासाठी इथल्या अनेक विद्यापीठांमध्ये असंख्य विद्यार्थी येत असत. साहजिकच गुरुपूजनाची परंपरादेखील आपल्या देशात हजारो वर्षांपासून आहे. परकीय आक्रमणांमुळे विद्यापीठे नष्ट झाल्यावर संतांनी ज्ञानदानाची परंपरा जोपासली; परंतु ब्रिटिश काळात देश मानसिक गुलामगिरीत जखडला गेला. जोपर्यंत आपण त्या मानसिकतेतून बाहेर पडत नाही, तोपर्यंत भारत विश्वगुरू पदापर्यंत पोहोचू शकत नाही!’ सुरेखा कटारिया यांनी, ‘कोणत्याही सामाजिक कार्यातून मिळणारा आनंद हाच खरा पुरस्कार असतो!’ असे मत व्यक्त करून ‘चला वंदू या गुरूंना!’ ही स्वरचित कविता सादर केली. श्रीकांत चौगुले यांनी प्रास्ताविकातून ‘अध्यापनाचे कर्तव्य पार पाडत असताना समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांचा शोध घेऊन त्यांना सन्मानित करणे हे कलारंजन प्रतिष्ठानचे नैतिक कर्तव्य आहे!’ अशी भूमिका मांडली. पुरस्कारार्थींच्या वतीने पांडुरंग भुजबळ आणि प्रज्ञा देशपांडे यांनी प्रातिनिधिक मनोगतातून कृतज्ञता व्यक्त केली. बाबुराव हंद्राळे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘शिष्य हा गुरूपेक्षाही मोठा झाला पाहिजे अशा समर्पित भावनेतून गुरुजनांनी अध्यापन करावे!’ असे आवाहन केले.

दीपप्रज्वलन आणि अखंड भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. पूनम गुजर, शांता गायकवाड आणि गुरुकुलम् मधील शिक्षकांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. शिरीष पडवळ यांनी आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button