पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा शनिवारी चिंचवड येथे अभिष्टचिंतन सोहळा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांची उपस्थिती

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त येत्या शनिवारी (१२) अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती डॉ.सुनिल भंडगे, ॲड सतिश गोरडे, रवी नामदे यांनी दिली.
चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारी सकाळी साडे दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्याला पद्मभूषण डॉ.अशोक कुकडे, पद्मश्री रमेश पतंगे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल उपस्थित राहणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून गिरीश प्रभुणे पिंपरी-चिंचवड शहरातील समाजकार्यात कार्यरत आहेत. क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे ते अध्यक्ष आहेत. या अंतर्गत पुनरुत्थान समरसता गुरुकुलम चालविले जाते. या गुरुकुलममध्ये वंचित घटकांतील मुलांना शिक्षण दिले जात आहे. पारधी समाजासाठी ते काम करीत आहेत. या समाजातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झटत आहेत. अशा प्रभुणे यांचा शनिवारी अमृतमहोत्सवी वाढदिवस आहे. या सोहळ्याला शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.













