ताज्या घडामोडीपिंपरी
गौरी आगमनानिमित्त महिलांचा ‘खिळे मुक्त झाडं’ उपक्रम; निसर्ग पूजनाने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश”

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गौरी आगमनाच्या दिवशी, निसर्ग हीच खरी देवता या भावनेतून स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठान आणि अंघोळीची गोळी या संस्थांच्या वतीने ‘खिळे मुक्त झाडं’ उपक्रम राबवण्यात आला. चिंचवड येथील प्रेमलोक पार्कमध्ये या उपक्रमाअंतर्गत वीस झाडांवरून खिळे आणि स्टेपलरच्या पिना काढून त्या झाडांना मुक्त करण्यात आले.
संस्थेच्या अध्यक्षा निर्मला जगताप यांनी सांगितले की, “झाडांनाही जीव असतो, आपण तुळशीला दररोज पाणी घालतो, तशीच झाडांचीही काळजी घेतली पाहिजे. झाडांना खिळे ठोकून इजा करणे चुकीचे आहे.”
या उपक्रमात महिलांनी झाडांची पूजा केली, आरती म्हणाली आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
कार्यक्रमात उर्मिला चवरे, अनिता धाक्रस, जयश्री वीरकर, कमल टोणगे, अजित जाधव तसेच अंघोळीची गोळी संस्थेचे अध्यक्ष माधव पाटील यांनी सहभाग घेतला.













