गणेश विसर्जनात ११० विशेष पोलीस अधिकारी शहर पोलीस प्रशासनास सहकार्य करणार

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- श्री गणपती विसर्जनाच्या ७ व्या, ९ व्या, १० व्या व अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातील वाहतूक नियोजन आणि प्रमुख चौकातील बंदोबस्तासाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे ११० विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) पोलीस प्रशासनास सहकार्य करणार आहेत.
या संदर्भात निगडी वाहतूक विभागात झालेल्या आढावा बैठकीस पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर आणि समितीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले. गणेश तलाव, चिखली घाट, वाल्हेकरवाडी नदी घाट तसेच विसर्जन मिरवणुकीतील प्रमुख चौकांमध्ये एसपीओंची नियुक्ती होणार आहे.
निरीक्षक पाचोरकर यांनी विसर्जनावेळी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या मदतीचे महत्त्व अधोरेखित केले.
डॉ. पाटील यांनी सांगितले की, यंदा शहरात २२०० हून अधिक सार्वजनिक मंडळे व ३ लाखाहून अधिक घरगुती मूर्तींचे विसर्जन अपेक्षित आहे. महापालिका व पोलीस प्रशासनाने ४० पेक्षा जास्त घाटांवर व्यवस्था केली असून एसपीओंचे सहकार्य निर्णायक ठरणार आहे.














