ताज्या घडामोडीपिंपरी

शाडू मातीच्या गणेश मूर्तींना नदी विसर्जनाची परवानगी द्यावी – माजी नगरसेवक विजय शिंदे

Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, पर्यावरणाची जपवणूक करत धार्मिक परंपरा कायम राखण्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विजय शिंदे यांनी महानगरपालिका आयुक्तांना एक पत्र पाठवून, घरगुती आणि लहान सार्वजनिक गणेश मंडळांच्या शाडू मातीच्या गणेश मूर्तींना पवना आणि इंद्रायणी नदीच्या प्रवाहात विसर्जन करण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. पर्यावरणाची काळजी घेतानाच, नागरिकांच्या भावनांचाही आदर करण्याची गरज त्यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून, महानगरपालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिस (PoP) च्या मूर्ती आणि रासायनिक रंगांमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जनावर बंदी घातली आहे. शिंदे यांनी महापालिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, हा निर्णय पर्यावरणाच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्याचवेळी त्यांनी एक पर्यायी आणि पर्यावरणपूरक तोडगा सुचवला आहे.

आपल्या पत्रात शिंदे यांनी म्हटले आहे की, अनेक नागरिक आणि लहान गणेश मंडळे आता पर्यावरणाचे महत्त्व ओळखून शाडू मातीच्या (नैसर्गिक माती) मूर्तींची प्रतिष्ठापना करत आहेत. शाडू माती ही पाण्यात सहज विरघळते आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. या मूर्तींमध्ये हानिकारक रसायने किंवा विषारी पदार्थ नसल्याने, नदीतील जलचर आणि एकूणच परिसंस्थेला कोणताही धोका पोहोचत नाही.

शाडू मातीच्या मूर्तींना नदीत विसर्जनाची परवानगी दिल्यास, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे योग्य प्रकारे पालन करता येईल. तसेच, यामुळे अधिकाधिक नागरिकांना आणि मंडळांना शाडू मातीच्या मूर्ती वापरण्यास प्रोत्साहन मिळेल. हा निर्णय पर्यावरपूरक गणेशोत्सवाच्या चळवळीला आणखी बळ देणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

विजय शिंदे यांनी पत्राच्या शेवटी, महापालिकेने नदीच्या काही विशिष्ट आणि सुरक्षित ठिकाणी शाडू मातीच्या मूर्ती विसर्जनासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. या संदर्भात, सर्व नियमांचे आणि मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. आता महापालिका आयुक्त या मागणीवर काय निर्णय घेतात, याकडे पिंपरी-चिंचवडच्या गणेशभक्तांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button