महावितरणच्या दुर्लक्षामुळे महानगरपालिकेच्या पोलवर जीवघेणा धोका!”

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरात विजेचा बट्ट्याबोळ सुरू असताना, ताथवड्यातील रघुनंदन मंगल कार्यालयाच्या मागे असलेल्या महावितरणच्या ताथवडे शाखेचा निष्काळजीपणा समोर आला आहे. येथे वीजपुरवठा देताना सर्विस वायर महावितरणच्या पोलवर न देता महानगरपालिकेच्या स्ट्रीट लाईट पोलवरून पुरवण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या पोल शेजारील घरांना आणि नागरिकांना जीवघेणा वीज अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
या आधीही दोन वेळा अशा प्रकारे पोलवर करंट उतरल्याच्या घटना घडल्या असून, त्यामुळे महानगरपालिकेने त्या पोलवरील लाईट काढून टाकली आहेत. पोल पूर्णपणे काढून टाकण्यासाठी महावितरणला अनेक वेळा सांगण्यात आले, मात्र त्यांनी त्यांच्या वायर न काढल्यामुळे पोल अजूनही तसाच धोकादायक स्थितीत उभा आहे.
या पोलच्या अगदी शेजारी राहत असलेल्या श्री. सावंत यांच्या कुटुंबाला यामुळे सतत धोका जाणवत आहे. यावर प्रसिद्धी पत्रकातुन नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही महावितरणकडून कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. कार्यालयाकडून “लवकरच सुधारणा करू” अशी आश्वासने देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात काहीही घडताना दिसत नाही.
या संपूर्ण प्रकारामुळे महावितरणचा बेजबाबदारपणा आणि महानगरपालिकेच्या खांद्यावर टाकलेले जबाबदारीचे ओझे स्पष्टपणे समोर येते. सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेतो, हा खरा प्रश्न आता उभा ठाकला आहे.














