ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र
भाषा मानवी जीवन समृद्ध करतात! – डॉ. श्रीपाल सबनीस

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘संवादाचे माध्यम असलेल्या भाषा मानवी जीवन समृद्ध करतात!’ असे विचार ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा येथे शनिवार, (दिनांक १३ सप्टेंबर) व्यक्त केले. पालिदिनाचे औचित्य साधून लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान, पिंपरी आयोजित पाली परिसंवादात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डाॅ. श्रीपाल सबनीस बोलत होते. स्वागताध्यक्ष प्राचार्य डाॅ. शिवलिंग मेनकुदळे, पाली भाषा अभ्यासक ॲड. डाॅ. सुगंध वाघमारे, मनीषा भोसले, लेखिका ललिता सबनीस, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, समन्वयक प्राचार्य डाॅ. पांडुरंग भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
डाॅ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, ‘येत्या १७ सप्टेंबर रोजी पाली भाषादिन आहे. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादात सहभागी वक्त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण विचारांची मांडणी केली. सुमारे अडीच हजारांहून अधिक वर्षांपूर्वी भारताच्या कुशीत पाली भाषेचा जन्म झाला. कोणतीही भाषा ही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते तर भाषाभगिनी आपल्या साहचर्यातून मानवी जीवनाला समृद्धीचे आयाम प्रदान करीत असतात. लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान सुमारे एक वर्षांहून अधिक काळ पाली भाषेच्या संवर्धनासाठी वैविध्यपूर्ण उपक्रमांचे सातत्याने आयोजन करीत आहे, ही अतिशय स्तुत्य बाब आहे.’
महेंद्र भारती यांनी प्रास्ताविकातून बाबा भारती प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती दिली. पुरुषोत्तम सदाफुले, प्रा. डाॅ. जयश्री बाबर, प्रा. डाॅ. जयश्री आफळे, प्रा. डाॅ. गजानन भोसले, प्रा. डाॅ. सर्जेराव पवार, अरुण गराडे, प्रभाकर वाघोले, रवींद्र भारती, राजेंद्र वाघ, निमिष भारती, प्रकाश कांबळे, विजय कांबळे, अप्पा देशमुख, आनंदा कांबळे, सचिन कांबळे, आर. के. कांबळे यांनी संयोजनात सहकार्य केले. डाॅ. निरंजन फरांदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डाॅ. कांचन नलावडे यांनी आभार मानले.













