ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्रसांस्कृतिक

‘बुद्धाला स्वीकारण्यासाठी पाली भाषेकडे वळले पाहिजे! – डॉ. श्रीपाल सबनीस

पहिले पाली - मराठी साहित्य संमेलन संपन्न

Spread the love

 

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘मानवतेची भूमिका हाच बुद्धिवादी माणसांसमोर एकमेव पर्याय आहे; तसेच बुद्धाला स्वीकारण्यासाठी प्राचीन पाली भाषेकडे वळले पाहिजे!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आष्टा, तालुका वाळवा येथे केले.

लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान, पिंपरी – पुणे आणि संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या पाली – मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. ज्येष्ठ कविवर्य डॉ. विठ्ठल वाघ, स्वागताध्यक्ष अण्णा डांगे, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. तारा भवाळकर यांनी, ‘मातृभाषेचा पाया भक्कम असेल तर जगातील कोणतीही भाषा पंधरा दिवसांत शिकता येते!’ असे मत मांडले.

याप्रसंगी डॉ. सुनीलकुमार लवटे (लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार), ॲड. चिमण डांगे (अहिल्याबाई होळकर पुरस्कार), डॉ. पल्लवी बनसोडे (लोकशिक्षक बाबा भारती स्नेहबंध पुरस्कार), सुधीर सूर्यगंध, श्रीकांत आढाव, डॉ. कामायनी सुर्वे, डॉ. संगीता अहिवळे, प्रकाश कांबळे (लोकशिक्षक बाबा भारती साहित्य पुरस्कार) प्रदान करून सन्मानित करण्यात आले. पुरस्काराला उत्तर देताना डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी, ‘अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असताना मराठी आणि पाली या दोन्ही भाषांचे आकलन अन् विकास यासाठी हे संमेलन महत्त्वाची भूमिका पार पाडते आहे!’ अशी भावना व्यक्त केली.

पुरुषोत्तम सदाफुले यांनी लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांच्याशी प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून सुसंवाद साधला. त्यामध्ये पाली भाषेचा प्रसार करण्यासाठी दर महिन्याला एक कार्यशाळा आयोजित करून लोकशिक्षक बाबा भारती यांचे पाली भाषेच्या संदर्भातील कार्य दूरपर्यंत पोहोचविण्याची ग्वाही महेंद्र भारती यांनी दिली.

‘पाली भाषा : संकल्पना व स्वरूप’ या परिसंवादात डॉ. केशव देशमुख, मनीषा भोसले, सुगंधा वाघमारे यांनी सहभाग घेतला; तसेच डॉ. विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कविसंमेलनात अभिजित पाटील, लता ऐवळे – कदम, रमजान मुल्ला, धर्मवीर पाटील, राजेंद्र वाघ, सुनील जवंजाळ, उत्तम सावंत, आनंद हरी यांनी वैविध्यपूर्ण कवितांचे प्रभावी सादरीकरण केले.

संमेलनाच्या समारोप प्रसंगी आमदार जयंत पाटील, प्रा. शामराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. पांडुरंग भोसले यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button