सुसंस्कृत समाज, प्रगत राष्ट्रासाठी बंधुतेचा विचार रुजावा – डॉ. शिवलिंग मेनकुदळे
बाराव्या विश्वबंधुता विद्यार्थी व शिक्षक साहित्य संमेलनाचे उद्घाटन

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “सुसंस्कृत समाजाच्या योगदानातून राष्ट्राची उन्नती होत असते. त्यासाठी तरुण पिढीमध्ये बंधुभाव रुजायला हवा. बंधुता मूल्यातून एकोप्याची भावना, सुदृढ समाजाची निर्मिती होत असते. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये बंधुत्व मूल्याचे महत्व रुजण्यासाठी प्रयत्नशील असावे,” असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले.
विश्वबंधुता साहित्य परिषद व रयत शिक्षण संस्थेचे पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाराव्या विश्वबंधुता विद्यार्थी व शिक्षक साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉ. मेनकुदळे यांच्या हस्ते झाले. प्रसंगी विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अविनाश सांगोलेकर, स्वागताध्यक्ष डॉ पांडुरंग भोसले, कवी डॉ. अशोककुमार पगारिया, साहित्यिक प्रा. शंकर आथरे, कवयित्री संगीता झिंजुरके आदी उपस्थित होते. बंधुता गुणवंत पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. शिवलिंग मेनकुदळे म्हणाले, “देशाचा उभारणीत योगदान देणार्या विद्यार्थ्यांपर्यंत संस्काराची शिदोरी पोहचवणारा शिक्षक असतो. मोबाईल, इंटरनेटच्या विळख्यात सापडलेल्या तरुणाईला बाहेर काढण्यासाठी मार्गदर्शन करायला हवे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून संस्कार, मूल्ये रुजवली. हीच शिकवण पुढील पिढीला देण्यासाठी प्रयत्नशील आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करावा याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना देशाचा उभारणीत योगदान देण्यासाठी प्रेरित करण्याची आज आवश्यकता आहे.”
डॉ. अविनाश सांगोलेकर म्हणाले, “बंधुता ही केवळ राजकारण किंवा सामाजिक व्यवहारापुरती मर्यादित नसून ती शिक्षण आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रांमध्येही आवश्यक आहे. शिक्षण आणि साहित्य हे समाजाला जोडण्याचे आणि विचार समृद्ध करण्याचे महत्त्वाचे साधन आहे. या दोन्ही क्षेत्रांत बंधुतेची भावना रुजल्यास समाजातील सर्व स्तरांतील लोक एकत्र येऊन प्रगती साधू शकतील. शिक्षकांनी केवळ विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमावर आधारित ज्ञान देऊ नये, तर समाजात वावरताना येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांना नैतिक आणि सामाजिक मूल्यांचेही शिक्षण द्यावे.”
बंधुताचार्य प्रकाश रोकडे, प्रा. शंकर आथरे यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. पांडुरंग भोसले यांनी स्वागतपर मनोगत केले. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुहास निंबाळकर यांनी आभार मानले.








