डॉ. सतीश कांबळे यांची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात वैद्यकीय सहायता प्रमुखपदी नियुक्ती

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक व सहकार मंत्रालयाचे राज्यमंत्री तथा पुणे लोकसभेचे खासदार मा. मुरलीधर मोहोळ यांनी आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत डॉ. सतीश दत्तात्रय कांबळे यांची “वैद्यकीय सहायता प्रमुख” या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे.
गेल्या बारा वर्षांहून अधिक काळ समाजातील दुर्बल व गरजू घटकांसाठी वैद्यकीय मदतीसाठी कार्यरत असलेले डॉ. कांबळे हे मूळचे पुण्याचे असून “सनराईज मेडिकल फाउंडेशन” या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरातील हजारो रुग्णांना मोफत उपचार व आर्थिक सहाय्य मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
२०१५ साली त्यांच्या बहिणीला चौथ्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान झाल्यानंतर आलेल्या वैयक्तिक संघर्षाने प्रेरित होऊन त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आरोग्यसेवेसाठी झोकून दिले.
२०१६ पासून ते स्व. लोकनेते आमदार श्री. लक्ष्मण जगताप यांचे स्वीय सहायक म्हणून कार्यरत होते. त्या काळात त्यांनी आमदार कार्यालयात स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्ष उभारून, शासकीय योजनांपासून CSR निधीपर्यंत विविध स्रोतांद्वारे रुग्णांसाठी वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली.
दररोज २५ ते ३० रुग्ण त्यांच्या कार्यालयात येतात, ज्यांना उपचारासाठी मार्गदर्शन, आर्थिक सहाय्य व इतर सर्व सुविधा पुरवण्यात येतात.
त्यांच्या या सातत्यपूर्ण, नि:स्वार्थ आणि परिणामकारक कार्याची दखल घेत मा. मुरलीधर मोहोळ यांनी त्यांची “वैद्यकीय सहायता प्रमुख” म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग आता राष्ट्रीय पातळीवर गरजूंपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी होणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.








