ताज्या घडामोडीपिंपरी

“भारतीय संस्कृतीतून नैतिकतेचे संस्कार” – डॉ. जितेंद्र होले

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “वेद, पुराणे आणि रामायण , महाभारतासारखे ग्रंथ यांच्यातून धर्म, समाज, विज्ञान, अध्यात्म यांचा समन्वय अधोरेखित होतो. नैतिकता, पर्यावरण संवर्धन, स्त्री दाक्षिण्य, सामाजिक बांधिलकी आदींचे संस्करण होते. अठरा पुरणांमधील जीवनमूल्ये आणि तात्विक संकल्पना आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगातही दिशादर्शक ठरू शकतात. भारतीय परंपरा आणि संस्कृतीतून नैतिकतेचे संस्कार घडतात.” असे प्रतिपादन राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संशोधन अधिष्ठाता डॉ. जितेंद्र आत्माराम होले यांनी केले.

राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित महोत्सवात “महर्षी वेदव्यास रचित अठरा पुराण शास्र – संक्षिप्त परिचय” या विषयावरील व्याख्यान देताना डॉ. होले बोलत होते. अरुणाचल प्रदेश येथील एन आय टी चे संचालक डॉ. आर. पी. शर्मा हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संचालक डॉ. संतोष भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

अठरा पुराणांचे ऐतिहासिक, तात्त्विक व आध्यात्मिक महत्त्व विशद करताना डॉ. होले पुढे म्हणाले की, “अठरा पुराणे ही वेदव्यासांनी रचलेली असून त्यातून सृष्टीनिर्मितीपासून मोक्षप्राप्तीपर्यंतचा संपूर्ण आध्यात्मिक प्रवास उलगडतो. भागवत पुराण हे भक्तीचा सर्वोच्च आदर्श ठरते, तर गरुडपुराण मृत्यूपश्चात जीवन, कर्मसिद्धांत व आत्म्याच्या प्रवासाचे विवरण देते. मार्कंडेयपुराणातील राधाकृष्ण चरित्र, अग्निपुराणातील स्थापत्यकला व नीतिशास्त्र अशा गोष्टी समजतात. ” असे सांगितले.

डॉ. आर पी शर्मा आणि डॉ. संतोष भोसले यांनी गुरु शिष्य परंपरेचे महत्व सांगत आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पी. डी. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. सुबिम खान यांनी केले.

कार्यक्रमाच्या संयोजनासाठी प्रा. आशिष देवशेट्टे आणि यंत्र अभियांत्रिकी विभागाने विशेष परिश्रम घेतले.

विद्यार्थी व शिक्षक वृंद यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button