ताज्या घडामोडीपिंपरी

भारतीय संस्कृतीची पाळेमुळे खोलवर रुजलेली! – डॉ. अजित जगताप

नवयुगची दिवाळी सांज २०२५ उत्साहात संपन्न

Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील ३६ दिवसांचा सर्वात मोठा सण असूनही पाश्चात्त्य विचारांच्या आक्रमणांमुळे त्याचे महत्त्व कमी होत चालले आहे; परंतु कितीही षडयंत्रे केली तरी भारतीय संस्कृतीची  पाळेमुळे खोलवर रुजलेली असल्याने ती कधीही नष्ट होणार नाही!’ असे विचार संस्कृती संवर्धन व विकास महासंघाचे कार्यवाह डॉ. अजित जगताप यांनी दत्तोपंत म्हसकर सभागृह, पेठ क्रमांक २७, निगडी प्राधिकरण येथे  व्यक्त केले.
नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आणि स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी सांज २०२५ या कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. अजित जगताप बोलत होते. ह. भ. प. किसनमहाराज चौधरी, नवयुगचे अध्यक्ष राज अहेरराव, कार्याध्यक्ष प्रा. तुकाराम पाटील, सचिव माधुरी ओक, संचालक अरविंद वाडकर, पी. बी. शिंदे, म्हसकर संस्थेचे प्रदीप पवार, मिलिंद कुलकर्णी आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. अश्विनी कुलकर्णी यांनी नवयुगची तसेच मिलिंद कुलकर्णी यांनी संस्थांची प्रस्तावना केली. राज अहेरराव यांनी, ‘दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नवयुग आणि स्व. दत्तोपंत म्हसकर या दोन संस्थांच्या सहयोगातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल साहित्यिकांच्या दर्जेदार, समाजोपयोगी तसेच संस्कृतिमूल्य जपणाऱ्या साहित्याचे विनामूल्य प्रकाशन, विक्री आणि वितरण करण्यासाठी चार सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. तरी इच्छुकांनी आपले साहित्य स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक संस्थेकडे पाठवावे!’ असे आवाहन केले.
‘दिवाळी सांज २०२५’ या स्वरचित वृत्तबद्ध गेय भक्तिगीतांच्या विशेष कविसंमेलनात सूर्यकांत भोसले, राधाबाई वाघमारे, अश्विनी कोटस्थाने, रेवती साळुंखे, प्रदीप गांधलीकर, राजेंद्र पगारे, सुनीता घोडके, अरुण घोडके, माधुरी डिसोजा, जगदीश देशपांडे, शोभा जोशी, अशोक कोठारी, विनीता श्रीखंडे, प्रतिमा काळे, योगिता कोठेकर, राम गायकवाड, आय. के. शेख, सुरेश कंक, स्मिता देशपांडे, सुभाष चव्हाण, मच्छिंद्र झरंगे, जितेंद्र राॅय, रशीद अत्तार, अशोक वाघमारे, अरुण कांबळे, मनीषा पाटील, राजश्री मराठे, जगन्नाथ शिंदे, अभिजित काळे, संजय देशमुख, अशोक सोनवणे, डॉ. जयद्रथ आखाडे, सुहास घुमरे या कवींनी आपल्या वैविध्यपूर्ण रचनांचे प्रभावी सादरीकरण केले.
अत्तराचा फाया लावत अन् उपस्थित प्रत्येकाच्या हातून दीप प्रज्वलित करीत कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला; तसेच गुलाबपुष्प आणि दिवाळी फराळाचे पाकीट देऊन सर्वांना सन्मानित करण्यात आले.
अनिकेत गुहे, रजनी अहेरराव, नंदकुमार मुरडे, नेहा कुलकर्णी, बाबा कुलकर्णी, रमेश वाकनीस, अरुणा वाकणीस, उज्ज्वला केळकर, शरद काणेकर यांनी संयोजनात सहकार्य केले. माधुरी विधाटे यांनी कविसंमेलनाचे निवेदन केले; तर राजेंद्र घावटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संपत शिंदे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button