“स्वदेशीचा अंगीकार केल्यास भारत ‘विश्वगुरु’ होईल” – डॉ. अजित जगताप
संभाजीनगरमध्ये सामुदायिक अथर्वशीर्ष पठण

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “अथर्वशीर्ष पठण हा केवळ धार्मिक विधी नसून त्यामध्ये स्वदेशी वर आधारित स्वयंपूर्णतेचा गाभा आहे. पंचमहाभूतांच्या संगोपनातून मानवकल्याणाची आराधना आहे. बुद्धी, शक्ति, एकता आणि कर्तव्य या चार सूत्रांचा आधार घेत आपण जर विकासमार्गावर वाटचाल केली, तर भारत ‘विश्वगुरू’ होणार आहे.”
श्री गणेशोत्सवानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ निगडी, संस्कृती संवर्धन व विकास महासंघ, स्वा. सावरकर प्रतिष्ठान ,स्वा. सावरकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने “सामुहिक अथर्वशीर्ष पठण” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संभाजीनगर (चिंचवड) येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या छ. संभाजीराजे सभागृहात हा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर सामूहिक अथर्वशीर्ष पठणाच्या सामूहिक उच्चारांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. पठणानंतर झालेल्या प्रबोधनपर सभेत महासंघाचे कार्यवाह डॉ. अजित जगताप यांनी गणेश भक्तांना मार्गदर्शन केले.
डॉ. जगताप पुढे म्हणाले, “ स्वदेशीचा अंगीकार स्वदेशी उद्योगांना चालना, ग्रामीण स्वावलंबन, स्थानिक उत्पादनांचे संवर्धन, मातृभाषेतून शिक्षण व कौशल्यविकास, नैतिक शासन आणि पर्यावरणाशी सुसंगत विकास या संकल्पना व्यवहारात आल्या पाहिजेत. अथर्वशीर्षातील ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ ही प्रार्थना फक्त उच्चारली न जाता प्रत्यक्ष कृती आराखड्याचा पाया झाली, तर भारताच्या ‘विश्वगुरू’ पदाकडे जाणाऱ्या प्रवासाला नवे बळ मिळेल.”
कार्यक्रमाचे स्वागत राजेंद्र घावटे यांनी केले. प्रास्ताविक रविकांत कळमकर यांनी केले . महासंघाचे अध्यक्ष ह. भ. प. किसन महाराज चौधरी यांनीही संबोधित केले. व्यासपीठावर डॉ. अजित जगताप, अर्चना सोनार, कल्पना पाटील व ज्योती जोशी यांनी नेतृत्व केले.
या वेळी शिवानंद चौगुले, यशवंत कन्हेरे, भगवान पठारे, राहुल गावडे, महेश पवार, प्रवीण शेवते, संजय कुरबेट्टी, विनोद रामाने , जयश्री पवार, मनीषा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळी सकाळी झालेल्या सामूहिक पठणामुळे मंदिर परिसरात अपार श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. महिला, पुरुष, लहान मुले व ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटातील भाविकांचा मोठा सहभाग दिसून आला.
नागरिकांचा संकल्प
कार्यक्रमानंतर झालेल्या चर्चेत नागरिकांनी “एक कुटुंब–एक वृक्ष”, स्वदेशी उत्पादनांचा अंगीकार, स्थानिक उद्योगांना पाठबळ यावर विचारमंथन झाले.
कार्यक्रमाची सांगता प्रसाद वाटपाने झाली. श्रद्धा, शिस्त आणि स्वदेशाभिमान या त्रिसूत्रीवर आधारित असा सामूहिक उपक्रम संभाजीनगर, चिंचवडमध्ये मोठ्या यशस्वीपणे पार पडला. अथर्वशीर्ष पठणाच्या माध्यमातून प्रकट झालेला स्वदेशाभिमुखतेचा संदेश उपस्थितांनी मनोभावे स्वीकारला. “आपण बदललो तरच राष्ट्र बदलेल, आणि राष्ट्र बदलले तर भारत नक्कीच विश्वगुरू बनेल”, असा दृढ विश्वास या प्रसंगी सर्वांनी व्यक्त केला.















