ताज्या घडामोडीपिंपरी
डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचे औचित्य साधून पिंपरी येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये “आमच्या परिचारिका, आमचे भविष्य: परिचारिकांची काळजी घेणे अर्थव्यवस्था मजबूत करते” या संकल्पनेवर आधारित एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात स्वागतपर भाषणाने झाली. त्यानंतर परिचारिकांची प्रतिज्ञा, प्रार्थना गीत आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी परिचारिकांसाठी सर्वोत्तम इन्फ्युजन पद्धती यावरील एका हँडबुकचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर आणि परीक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध स्पर्धेमधील सहभागी विजेत्याना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यानिमित्त रुग्णालयाने नर्सिंग कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांना सहभागी करून घेण्यासाठी आठवडाभर विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. यात पुरुष कर्मचाऱ्यांची क्रिकेट स्पर्धा, पोस्टर प्रदर्शने, स्किल लॅब सेमिनार, नृत्य, गायनासह सांस्कृतिक कार्यक्रम यासह ‘केबीजी – कौन बनेगा ज्ञान पती’ या क्विझ स्पर्धेचा समावेश होता.
यावेळी बोलताना, *डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या (अभिमत विद्यापीठ) प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील* म्हणाल्या, “परिचारिका आपल्या आरोग्यसेवेची ताकद आहेत, त्यांची उपस्थिती, काळजी आणि करुणा शब्दांपेक्षा अधिक काम करते. कठीण काळात त्या उद्दिष्टापासून न हटता काम करतात, औषधांच्या पलीकडे जाऊन त्या उपचार करतात, त्यामुळे लोकांचे आयुष्य आणि मनही सकारात्मकतेने भरून जाते. त्यांचा शांतपणा, लवचिकता यामुळे रुग्ण बरे होण्याचा पाया घातला जातो. त्यामुळे परिचारिका आमच्या केवळ आदरालाच नव्हे, तर कृतज्ञतेसाठीही पात्र आहेत. आम्ही मनापासून त्यांच्या प्रती कृतज्ञ आहोत.”
*डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे (अभिमत विद्यापीठ) विश्वस्त आणि खजिनदार डॉ. यशराज पाटील* म्हणाले, “परिचारिका रुग्णालयाच्या काळजी व्यवस्थेचा कणा आहेत. त्यांची शांतपणे काम करण्याची वृत्ती, समर्पण आणि करुणा केवळ रुग्णांवरच नव्हे, तर संपूर्ण आरोग्यसेवेच्या परिसंस्थेवर कायमस्वरुपी प्रभाव करते. या परिचारिका दिनी, आम्ही त्यांच्या अथक प्रयत्नांचा सन्मान करतो आणि शक्य त्या सर्व प्रकारे नर्सिंग समुदायाला पाठिंबा देण्याच्या आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहण्याची आमची वचनबद्धता अधोरेखित करतो.”
*डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्राच्या अधिष्ठाता डॉ. रेखा आर्कोट* म्हणाल्या, “ आपण आरोग्यसेवेबद्दल बोलतो तेव्हा प्रत्येकजण हे मान्य करतो, की डॉक्टर आणि परिचारिका यशाचे आधारस्तंभ आहेत. परंतु, बहुतेकवेळा परिचारिका त्यांच्या कर्तव्यापेक्षा भावनिकदृष्ट्याही रुग्णांची काळजी घेतात, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. केवळ इंजेक्शन देणे किंवा प्रक्रियांमध्ये मदत करणे इतकेच त्या करत नाहीत, तर भीती आणि अनिश्चिततेच्या क्षणांमध्ये त्या रुग्णांना आश्वस्त करतात. त्यांचा हात हातात घेऊन धीर देतात, त्यांना मार्गदर्शन करतात. त्यांची ती शांतपणे आश्वस्त करण्याची शक्तीच खऱ्या अर्थाने नर्सिंग व्यवसायाची परिभाषा अधोरेखित करते.”
*डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील परिचारिका विभागाच्या संचालिका नीलाक्षी श्रीवास्तवा* म्हणाल्या, “सगळे जग उत्सव साजरा करत असले, तरी आमच्या परिचारिका शांतपणे, निःस्वार्थपणे आणि प्रामाणिक समर्पित भावनेने सेवा देत राहतात. त्यांची वचनबद्धता ही दर्जेदार आरोग्यसेवेचा पाया आहे. परिचारिकांना पाठिंबा देऊन आम्ही केवळ त्यांच्या सेवेचा सन्मान करत नाही, तर आरोग्यसेवा प्रणालीचा आणि अर्थव्यवस्थेचा गाभा मजबूत करतो.”
या कार्यक्रमामुळे दर्जेदार आरोग्यसेवा प्रदान करण्यातील आणि लवचिक आरोग्य प्रणाली निर्माण करण्यातील परिचारिकांची महत्त्वाची भूमिका पुन्हा एकदा सिद्ध झाली.













