वसुबारसेला गोपुजन, वर्षभरासाठी गोरक्षणाचा संकल्प भाजपा युवा मोर्चाचा पुढाकार; अध्यक्ष दिनेश यादव यांची माहिती

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली आणि कुदळवाडी परिसरात वसुबारस निमित्ताने विविध ठिकाणी गाय-वासरांचे पूजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक गोसेवक आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन गोरक्षणाचा संकल्प करत पूजनाचे आयोजन केले आहे. यासाठी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने पुढाकार घेण्यात आलेला आहे अध्यक्ष दिनेश यादव यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
याबाबत भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष दिनेश यादव म्हणाले, गाय आणि वासराचे पूजन ही भारतीय संस्कृतीतील एक श्रद्धेची बाब आहे. गोमातेचे केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. या वर्षी वसुबारस साजरी करताना नागरिकांनी केवळ पूजनापुरते मर्यादित न राहता, वर्षभर गोरक्षणासाठी कार्य करावे, असा संदेश देण्यात आला आहे.
शुक्रवारी (दि 17)पूजनासाठी चंद्रभागा गोशाळा, रामदास नगर, चिखली, पै. निलेश यादव फार्म, प्रथमेश पार्क शेजारी, कुदळवाडी गणेश किसन आप्पा यादव फार्म, इंद्रायणी वजन काट्या मागे, कुदळवाडी येथे गोसेवा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या ठिकाणी परिसरातील नागरिक, गोभक्त, शेतकरी आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. कार्यक्रमामध्ये पारंपरिक पद्धतीने पूजन, गोसेवेचे महत्त्व सांगणारे मार्गदर्शन, तसेच स्थानिक पातळीवर गोरक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.













