ताज्या घडामोडीपिंपरी

दिलासाचे वार्षिक सदरलेखन करणारे साहित्यिक सन्मानित

Spread the love

 

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते दिलासा साहित्य सेवा संघाच्या व्हॉट्सॲप समूहावर वार्षिक सदरलेखन करणाऱ्या साहित्यिकांना महाराणा प्रताप गौशाळा सभागृह, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. राजेंद्र कांकरिया, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख, प्रकाशक नितीन हिरवे, दिलासा साहित्य सेवा संघाचे अध्यक्ष सुरेश कंक, उपाध्यक्ष सुभाष चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

याबाबत अधिक माहिती देताना सुरेश कंक यांनी सांगितले की, ‘सध्याच्या काळात संपर्क, संदेशवहन आणि अभिव्यक्तीसाठी व्हॉट्सॲप हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे, ही बाब पाच वर्षांपूर्वी करोना काळात लक्षात आली. या माध्यमाचा सकारात्मक वापर करून दिलासा व्हॉट्सॲप समूहाने आठवड्यातील सात दिवस सात वेगवेगळ्या लेखकांना त्यांच्या आवडीच्या विषयावर सदरलेखन करण्याचे आवाहन केले. विजयादशमीपासून प्रारंभ करण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एका वर्षाच्या कालावधीत यामध्ये सहभागी झालेल्या लेखकांची पुस्तकं प्रकाशित झालीत. त्यामुळे वेगवेगळे लेखक आणि वेगवेगळे विषय निवडून सलग पाच वर्षे हा सदरलेखनाचा उपक्रम यशस्वीपणे सुरू आहे. या उपक्रमांतर्गत विजयादशमीला अशोकमहाराज गोरे (‘वेदावतार तुकोबा’), नारायण कुंभार (‘गण गणात बोते’), राधाबाई वाघमारे (‘अंधारातून उजेडाकडे’), ‘शामला पंडित (‘बोधकथा’), सीमा गांधी (‘साहित्यदीप’), शामराव सरकाळे (‘साधी माणसं – प्रेरणादायी विचार’) यांना सन्मानित करण्यात आले असून आगामी वर्षभरात नवीन लेखक, नवीन विषय घेऊन सदरलेखनासाठी सिद्ध झाले आहेत.’ यावेळी गिरीश प्रभुणे यांनी आपल्या मनोगतातून साहित्यिकांना मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या. अंबादास रोडे, बाळकृष्ण अमृतकर, विलास कुंभार, मुरलीधर दळवी, फुलवती जगताप यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी एकोंडे यांनी आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button