गणपती बाप्पा मोरया! मुर्तीदान करू या! पथनाट्यातून जनजागृती

पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिलासा संस्था , मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थांच्या वतीने पिंपळे गुरव येथील नदी घाटावर गणपती मूर्तीदान करा!असा संदेश पथनाट्यातून देऊन जनजागृती करण्यात आली.
दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, मुरलीधर दळवी,अरुण परदेशी यांनी पथनाट्यात सहभाग घेतला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पालिका क्षेत्रात नदी घाटावर पाण्याचे हौद तयार केले आहेत. त्याच ठिकाणी गणेश विसर्जन सर्वांनी करावे हा संदेश पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला.
यावेळी अण्णा जोगदंड म्हणाले.. ” श्री चे विसर्जन पाच, सात, नऊ आणि अनंत चतुर्दशी या दिवशी मोठ्या प्रमाणात होते. गणेश मूर्तीदान केल्याने अथवा हौदात विसर्जन केल्याने नदी प्रदूषण निश्चित कमी होईल. काळानुरूप माणसाने बदलले पाहिजे.! निर्माल्य नदीत न टाकता महानगरपालिकेने ठेवलेल्या निर्माल्य कुंडीत टाकावे जनतेचे प्रबोधन व्हावे म्हणून पथनाट्य घेण्यात आले आहे,असे विचार आण्णा जोगदंड यांनी व्यक्त केले.
दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक म्हणाले.. ” गणपतीला त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी म्हणले जाते. आपण सर्वांनी ज्ञान आणि विज्ञान याची सांगड घालून काम केले पाहिजे. येत्या काही वर्षात गणेश मूर्तीदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हौदात गणपती विसर्जन करण्याकडे गणेश भक्तांचा कल दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिके तर्फे तसेच शहरातील अनेक संस्थांच्या वतीने मूर्ती दान हा उपक्रम राबविला जात आहे. त्याचे महत्व विषद करण्यासाठी साध्या सोप्या भाषेत पथनाट्यातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.”
यावेळी महानगरपालिकेचे ड प्रभागाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने म्हणाले की “या दोन्ही संस्थांचे सामाजिक काम खूप चांगले आहे ,नेहमी पालिकेच्या वेगवेगळ्या उपक्रमात या संस्था सहभागी होत असतात. यापुढेही या संस्थांना आम्ही पालिकेच्या विविध उपक्रमात सामावून घेऊ.”
यावेळी महानगरपालिकेचे ड आरोग्य निरीक्षक रश्मी तुंडलवार, गजानन धाराशिवकर शंकर नानेकर,प्रदिप गायकवाड,गुणवंत कामगार काळूराम लांडगे , पांडुरंग सुतार,ज्येष्ठ नागरिक सांगवी संघाचे अध्यक्ष कमलाकर जाधव ,सचिव सुरेंद्र शेळके,अस्मिता साळुंके,बेसिक टिमचे राहूल जाधव,सागर पाटील,विवेक जावीर,शिवाजी निम्हण ,बंटी कदम,वर्षा नानेकर,सुरक्षा रक्षक रूपाली कांदलकर, जनार्दन खेडकर उपस्थित होते. श्री गणेशाची विधिवत पूजा अन् आरती करून मुर्तिदान करण्यात आले.


















