घराघरांत तपासणी, औषध फवारणी व जनजागृतीवर दिला जातोय भर, ४० लाख ५८ हजार रुपयांचा दंड वसूल
डेंग्यू व मलेरियासारख्या संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी महापालिकेची व्यापक मोहीम

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका डेंग्यू व मलेरियासारख्या संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी सातत्याने कार्यरत असून, नागरिकांच्या आरोग्यरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत घराघरांत तपासणी, औषध फवारणी, जनजागृती उपक्रम तसेच कठोर दंडात्मक कारवाईला गती देण्यात आली आहे. याच अनुषंगाने १ जून २०२५ पासून आतापर्यंत सुमारे ४ हजार १३७ ठिकाणी नोटिसा बजावल्या असून, १ हजार १४२ जणांवर थेट दंडात्मक कारवाई करून ४० लाख ५८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त सचिन पवार यांच्या अधिपत्याखाली महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून औषध फवारणी, घराघरांत तपासणी, बांधकामस्थळांवरील पाहणी, कंटेनर तपासणी तसेच जनजागृती कार्यक्रम व दंडात्मक कारवाई अशा बहुआयामी मोहिमांना गती देण्यात आली आहे. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांतून समन्वय साधून याबाबतचा एकत्रित आराखडा तयार करण्यात आला आहे. या उपक्रमांमुळे डासांची उत्पत्ती कमी होत असून, संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होत आहे.
…..
*तपासणी व कारवाईचा तपशील*
*(आकडेवारी १ जून २०२५ पासून १४ सप्टेंबर २०२५ पर्यंतची)*
• घरांची तपासणी : ९ लाख ८० हजार ३८० घरांची पाहणी; त्यापैकी १४ हजार २७४ घरांच्या परिसरात डास उत्पत्तीची चिन्हे आढळली.
• कंटेनर तपासणी : निवासी घरे,संस्था,आदी ठिकाणच्या विविध ५१ लाख ८४ हजार ९७२ कंटेनर (भांडी,ड्रम,कुंड्या,पाणी साठवणीची ठिकाणे आदी) तपासले गेले; त्यापैकी १५ हजार ४०७ ठिकाणी डास वाढीस पोषक वातावरण नोंदले गेले.
• टायर पंक्चरची व भंगार दुकाने : २ हजार ११ भंगार दुकाने तपासून तातडीने सूचना व सुधारणा.
• बांधकामस्थळे : २ हजार २१३ ठिकाणी पाहणी करून अस्वच्छता दूर करण्याची कारवाई.
• नोटिसा व दंडात्मक कारवाई : ४ हजार १३७ ठिकाणी नोटिसा बजावल्या तर १ हजार १४२ नागरिक व आस्थापनांवर थेट दंडात्मक कारवाई करून ४० लाख ५८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
जनजागृतीवर दिला जातोय भर
महापालिकेने फक्त कारवाईवरच भर न देता जनजागृती व स्वच्छता उपक्रम राबवण्यास देखील प्राधान्य दिले आहे. यामध्ये घराघरांत माहितीपत्रकांचे वितरण, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आरोग्य व स्वच्छतेबाबत प्रशिक्षण, प्रभागस्तरीय विशेष कार्यक्रम, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिमा व औषध फवारणीची सततची मोहीम असे विविध उपक्रम महापालिका राबवत आहे. याशिवाय आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, घराच्या परिसरात पावसाचे पाणी साचू देऊ नका, घर व आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता ठेवा, असे आवाहन नागरिकांना महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने डेंग्यू व मलेरियासारख्या संसर्गजन्य आजारांवर आळा घालण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने उपाययोजना राबवल्या आहेत. औषध फवारणी, घराघरांत तपासणी, बांधकामस्थळांवरील पाहणी, कंटेनर तपासणी यांसोबतच नागरिकांसाठी जनजागृती मोहिमा राबवण्यात महापालिकेकडून प्राधान्य दिले जात आहे. या मोहिमांमुळे डासांची उत्पत्ती कमी होऊन संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होत आहे. पुढील काळातही ही कारवाई अधिक काटेकोरपणे व नियोजनबद्ध राबवली जाईल.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र नागरिकांचा सहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळल्यास डेंग्यू व मलेरियाचा प्रादुर्भाव आटोक्यात येऊ शकतो.
– सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका













