डेंग्यू मुक्त शहरासाठी महापालिकेची जोरदार मोहीम
जनजागृतीबरोबरच अनेक आस्थापनांवर केली दंडात्मक कारवाई

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या डासजन्य आजारांना अटकाव करण्यासाठी महापालिकेने आक्रमक पावले उचलली आहेत. औषध फवारणीपासून ते थेट दंडात्मक कारवाईपर्यंत आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तसेच उप आयुक्त सचिन पवार यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे. घरगुती पातळीपासून औद्योगिक व बांधकाम स्थळांपर्यंत सखोल तपासण्या सुरू असून, यामध्ये डासाच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा शोध घेऊन त्वरित कारवाई केली जात आहे.
* आठ ही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत करण्यात आली कारवाई
* घरांची तपासणी: ४ लाख ६० हजारांहून अधिक घरांपैकी सुमारे ८ हजार परिसरात डास उत्पत्तीचे स्रोत आढळले.
* कंटेनर तपासणी: २४.५ लाख कंटेनरपैकी ९,२०० कंटेनरमध्ये डास वाढीस पोषक स्थिती.
* भंगार दुकाने व बांधकाम स्थळे: १०६६ भंगार दुकाने व १४८१ बांधकाम स्थळांची पाहणी.
* दंडात्मक कारवाई: ३१५९ नोटीसा, ५०१ ठिकाणी थेट दंड — १६.९२ लाखांचा दंड वसूल.
जनजागृतीचा कार्यक्रम :
महापालिकेकडून केवळ कारवाई नाही, तर जनजागृतीही प्रभावीपणे राबवली जात आहे.
प्रत्येक घरात माहितीपत्रके पोहोचवली जात आहेत.
शाळांमधून विद्यार्थ्यांना डास प्रतिबंधाबाबत प्रशिक्षण दिलं जात आहे.
सार्वजनिक ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाते आहे.
प्रत्येक प्रभागात स्थानिक स्तरावर जनजागृती उपक्रम आयोजीत केले जात आहेत.
महापालिकेकडून डासांच्या उत्पत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी सर्व स्तरावर उपाययोजना सुरू असून, डेंग्यू मलेरियासारख्या आजारावर मात करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्वाचे आहे.
— शेखर सिंह,
आयुक्त तथा प्रशासक,
पिंपरी चिंचवड महापालिका
नागरिकांनी डासजन्य आजारांपासून मोठ्या प्रमाणात बचाव करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळून घरात व आजूबाजूला पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
— सचिन पवार
उप आयुक्त, आरोग्य विभाग
पिंपरी चिंचवड महानगरपालिका













