ताज्या घडामोडीपिंपरी

डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजनांना मिळतेय गती!

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून राबवण्यात येतेय व्यापक मोहीम

Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती देण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे व उपायुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली आहे. डास उत्पत्ती ठिकाणांचा शोध घेऊन ती त्वरित नष्ट करणे, डासनाशक फवारणी करणे, अशा मोहिमा व्यापकपणे राबवण्यासोबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यास देखील प्राधान्य दिले जात आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने डेंग्यू व मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरभर धडक मोहीम सुरू केली आहे. औषध फवारणी, घरांची व कंटेनर तपासणी, भंगार दुकाने व बांधकाम स्थळांची पाहणी यासोबतच जनजागृती व दंडात्मक कारवाईवरही भर दिला जात आहे. याशिवाय घराघरात माहितीपत्रकांचे वाटप, शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम, प्रभागस्तरावर विशेष अभियान, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कामकाज सुरू आहे.

आठही प्रभागांत मिळून आतापर्यंत करण्यात आलेली कारवाई

घरांची तपासणी: एकूण ६ लाख ७७ हजार २२२ घरांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ११ हजार ४९० ठिकाणी डास उत्पत्तीसाठी पोषक परिस्थिती आढळून आली.

कंटेनर तपासणी: ३६ लाख ४ हजार ७२१ कंटेनर तपासण्यात आले असून, त्यातील १२ हजार ४४५ कंटेनरमध्ये डास वाढीसाठी पोषक वातावरण होते.

भंगार दुकाने तपासणी: एकूण १ हजार ४९५ भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली.

बांधकाम स्थळे: १ हजार ८१२ बांधकाम स्थळांची तपासणी करण्यात आली. यामध्ये साचलेले पाणी व अस्वच्छता निदर्शनास आली.

दंडात्मक कारवाई: ३ हजार ७०६ ठिकाणी नोटीस बजावण्यात आल्या. ८३३ नागरिक व आस्थापनांवर थेट कारवाई करून २९ लाख ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

डेंग्यू आणि मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून सर्व स्तरांवर उपाययोजना सुरू आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत, त्या भागावर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश आरोग्य आणि वैद्यकीय विभागांना दिले आहेत. डेंग्यू, मलेरियाच्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या जनजागृती मोहिमेत नागरिकांनी देखील सक्रिय सहभाग घ्यावा. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. तसेच लक्षणे आढळल्यास तत्काळ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात संपर्क साधावा.

— विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

डेंग्यू व मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरभर धडक मोहीम सुरू केली आहे. नागरिकांनी देखील आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेस सर्वतोपरी सहकार्य करावे.

— सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button