दापोली-मडनगड सेवा भावी संस्थेच्या वतीने कोकणवासीयांसाठी मोफत बससेवा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे पिंपरी-चिंचवड येथील दापोली-मडनगड सेवा भावी संस्थेच्या वतीने कोकणवासीयांसाठी एक अभिनव आणि सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष राजेश दळवी तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या संयुक्त प्रयत्नातून वल्लभ नगर (पिंपरी) ते मडनगड, दापोली या मार्गावर दि. २५ ऑगस्ट रोजी मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली.
या उपक्रमाचा उद्देश गणेशोत्सव व सणासुदीच्या काळात कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या नागरिकांना सुरक्षित, विनामूल्य आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे हा होता. या बससेवेचा अनेक कोकणवासीयांनी लाभ घेतला आणि संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सुंदर नियोजन, प्रवाशांसाठी आवश्यक त्या सुविधा, आणि वेळेचे पालन यामुळे या उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळाला. संस्थेचे पदाधिकारी व स्वयंसेवक यांनी प्रवासादरम्यान उत्तम व्यवस्थापन करून प्रवाशांची विशेष काळजी घेतली.
दापोली-मडनगड सेवा भावी संस्था अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक व मानवतावादी कार्यात अग्रस्थानी असून, कोकणाशी नाळ जोडलेली असलेली ही संस्था कोकणवासीयांसाठी सतत विविध उपक्रम राबवते.
कोकणवासीयांनी या उपक्रमाचे स्वागत करत, संस्थेच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.















