श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे यांच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत थेरगाव येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी तरुण मंडळाने प्रथम, भोसरीतील कै.दामूशेठ गव्हाणे मित्र मंडळाने द्वितीय, वाल्हेकरवाडीतील चिंतामणी मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. ट्रस्टच्या वतीने निगडी येथील पत्रकार परिषदेत या स्पर्धेचा निकाल आणि बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ येत्या गुरुवारी ३१ जुलै प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महेश सूर्यवंशी यांनी दिली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासणे, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, अक्षय गोडसे, अमोल केदारी, राजाभाऊ गोलांडे, ललित म्हसेकर आदी उपस्थित होते.
या गणेशोत्सव स्पर्धेमध्ये थेरगाव येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी तरुण मित्र मंडळाच्या ‘आधी लगीन कोंढाण्याचे’ या जिवंत देखाव्यास प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्याचबरोबर भोसरीतील कै. दामूशेठ गव्हाणे मित्र मंडळाच्या ‘इतिहासातील पहिला सर्जिकल स्ट्राइक’ या हलत्या देखाव्यास द्वितीय क्रमांक तर वाल्हेकरवाडी चिंचवड येथील चिंतामणी मित्र मंडळाच्या ‘चला खेळ खेळू या’ या जिवंत देखाव्यात तृतीय क्रमांक आणि आकुर्डीतील भैरवनाथ मित्र मंडळाच्या ‘आता तरी शहाणे होऊ’ या जिवंत देखाव्यास चौथा क्रमांक आणि पिंपळे गुरव येथील भैरवनाथ तरुण मित्र मंडळाच्या ‘शहीद भगतसिंग यांचे बलिदान’ या जिवंत देखाव्यास पाचवा क्रमांक मिळालेला आहे.
सांगवी येथील बाबूरावजी घोलप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पर्यावरण देखाव्यात चतुर्थ क्रमांक आणि सांगवीतील नृसिंह हायस्कूलच्या पर्यावरणपूरक देखाव्यास पाचवा क्रमांक देण्यात आला आहे. त्याचबरोबर गृहनिर्माण सोसायटी यांच्यासाठीही गणेशोत्सवासही बक्षीस देण्यात आली आहेत. रावेत येथील भोंडवे एम्पायर सांस्कृतिक मंडळाच्या ‘ऐतिहासिक गड राजगडचा नगरखाना’ या देखाव्यास प्रथम क्रमांक, पिंपरी गावातील सुखवानी सोसायटीला सोसायटीच्या पर्यावरणपूरक देखाव्यास द्वितीय क्रमांक, जुनी सांगवीतील जयराज रेसिडेन्सीच्या मंदिरास तृतीय क्रमांक आणि जाधववाडीच्या शुभारंभ हाउसिंग सोसायटीच्या पर्यावरण पूरक देखाव्यास चतुर्थ क्रमांक निगडीतील शुभम सोसायटीच्या पर्यावरणपूरक देखाव्यास पाचवा क्रमांक जाहीर झाला. विजेत्यांना लवकरच बक्षिसांचे वाटप करण्यात येणार असल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.
थेरगाव येथील प्रेरणा महाविद्यालयाचा प्रथम क्रमांक
थेरगाव येथील प्रेरणा माध्यमिक तुकाराम गुजर कनिष्ठ महाविद्यालयाच्या ‘मला माझा भारत देश विकायचा आहे’ या देखाव्यास प्रथम क्रमांक, आकुर्डींतील केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या पर्यावरणपूरक देखाव्यास द्वितीय, आकुर्डीतील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या पर्यावरण पूरक देखाव्यास तृतीय क्रमांक मिळाला आहे.
महोत्सवी मंडळांना विशेष बक्षीस..
महोत्सवी मंडळांना विशेष बक्षीस देण्यात येणार आहे. पिंपरीतील समर्थ हनुमान मित्र मंडळ, चिंचवड येथील ज्ञानदीप मित्र मंडळ, पिंपरीतील पवना मित्र मंडळ, किवळेतील श्री शिवछत्रपती तरुण मित्र मंडळ, पिंपरीतील सुदर्शन मित्र मंडळ, आकुर्डीतील जय महाराष्ट्र मित्र मंडळ, कासारवाडीतील नवनाथ मित्र मंडळ फुगेवाडीतील महाराणा प्रताप मित्र मंडळ, भोसरीतील श्री संत सावता तरुण मित्र मंडळ, चिखलीतील वीर अभिमन्यू मित्र मंडळ, रामनगर येथील परशुराम मित्र मंडळ यांना यांचा विशेष गौरव केला जाणार आहे.














