दगडूशेठ गणपती समोर अथर्वशीर्ष पठण विक्रमाची ग्लोबल बुक ॲाफ एक्सलेंस, इंग्लंड मध्ये नोंद

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गणेश उत्सव काळात दरवर्षी ऋषिपंचमी दिवशी हजारो महिला भगिनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर सामूहिक अथर्वशीर्ष पठण करतात. यावर्षी ३५ हजार २१५ महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता. हा एक जागतिक विक्रम आहे. याची नोंद ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड मध्ये करण्यात आली.
या वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड या संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. दीपक हरके यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट चे कोषाध्यक्ष महेशराव सूर्यवंशी यांना नुकतेच प्रदान केले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त मंडळ सदस्य व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीनेही डॉ. दीपक हरके यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला व त्यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी डॉ. हरके यांनी गणेश भक्त, भाविकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.














