संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज भेटीचे समुहशिल्प, संतसृष्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लोकार्पण

पिंपरी चिंचवड महापालिकेने केली उभारणी, विविध विकास प्रकल्पांचे आज होणार भूमिपूजन आणि उदघाटन
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पुणे-आळंदी पालखी मार्गावर वडमुखवाडी येथे उभारण्यात आलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज भेटीचे समुहशिल्प व संतसृष्टीचे लोकार्पण, संतपीठ येथील प्रेक्षागृह व कलादालन लोकार्पण यासह विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १८ जून २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
याप्रसंगी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याव्यतिरिक्त खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार अरूण लाड, उमा खापरे, जयंत आसगावकर, योगेश टिळेकर, अमित गोरखे, दिलीप वळसे पाटील, भीमराव तापकीर, विजय शिवतारे, महेश लांडगे, राहुल कुल, बापूसाहेब पठारे, सुनिल कांबळे, चेतन तुपे, शरद सोनवणे, सिद्धार्थ शिरोळे, सुनिल शेळके, बाबाजी काळे, हेमंत रासणे, शंकर मांडेकर, शंकर जगताप, ज्ञानेश्वर कटके यांची उपस्थिती असणार आहे. तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर हे देखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
संतसृष्टीचा लोकार्पण कार्यक्रम थोरल्या पादुका, वडमुखवाडी, च-होळी येथे सकाळी १०.३० वाजता होईल. नवीन पिढीला आपल्या संस्कृतीमधील वारकरी संप्रदायाची व संतांची माहिती समजण्यासाठी संतसृष्टीची निर्मिती केली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या ऐतिहासिक भेटीचे स्मरणरूप ‘संतसृष्टी’ साकारण्यात आली आहे. या ठिकाणी मिश्र धातूपासून तयार करण्यात आलेली २५ शिल्पे असून ज्यामध्ये संत नामदेव महाराज,संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान महाराज, संत निवृत्ती महाराज, संत मुक्ताबाई आणि २० वारकरी समाविष्ट आहेत. या शिल्पांसोबतच चौथरा, रिटेनिंग वॉल, स्टोन क्लॅडिंग, ओपन एअर थिएटर, विद्युत आणि बागकाम, रेलिंग व स्वच्छतागृह यांची कामेही पूर्ण झाली आहेत. या परिसरात संतांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांवर आधारित ४७ ब्रॉन्झ म्युरल्स उभारण्यात आले असून, त्यांच्या शेजारी माहिती देणारे फलकही लावण्यात आले आहेत. या संतसृष्टीचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे.
*चिखली येथील संतपीठ*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चिखली येथील संतपीठ येथे प्रत्यक्ष भेट देणार असून तेथे उभारण्यात आलेल्या प्रेक्षागृह व कलादालनाचे लोकार्पण त्यांच्या शुभहस्ते होणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने टाळगाव चिखली येथे “संतपीठ“ स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये तळमजला तसेच ५ मजले असे इमारतीचे नियोजन करण्यात आले असून त्याचे एकूण बांधकाम क्षेत्र १३१६१.७१ चौरस मीटर इतके आहे. या इमारतीमध्ये एकूण ४ उद्वाहक विकसित करण्यात आले आहेत. सोबतच दिव्यांग मुले आणि व्यक्तींकरिता रॅम्प ची सुविधा देखील करण्यात आली आहे. याशिवाय इमारतीमध्ये एकूण ५५ वर्गखोल्या,९ कार्यालये ,४० इतर खोल्या ज्यामध्ये प्रयोगशाळा, संगणक कक्ष, सभागृह, संगीत तथा वाद्य कक्ष, प्रत्येक मजल्यावर स्वच्छतागृहे, विद्यार्थ्यांना खेळण्याकरिता विस्तीर्ण मैदान आदींचे नियोजन केले आहे. इमारतीसाठी आवश्यक विद्युत व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था करण्यासाठी विद्युत विभागाच्या कामांचा देखील यामध्ये समावेश आहे. या संतपीठामध्ये उभारण्यात आलेल्या प्रेक्षागृह आणि कलादालनाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. तसेच याठिकाणी पिंपरी चिंचवड शहरात १ लाख ५० हजार देशी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात येईल.
*टाऊन हॉल चिखली येथे विविध विकासकामांचे ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन व लोकार्पण*
संतपीठ येथील कार्यक्रम झाल्यानंतर चिखली टाऊन हॉल येथे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने विकसित ज्येष्ठानुबंध ज्येष्ठ नागरिकांकरिता अँप व ट्राफिक बडी वाहतूक नियमनाकरिता व्हॉट्स अँप प्रणालीचे लोकार्पण तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेचे विविध विकास कामांचे भूमिपूजन, उदघाटन, लोकार्पण ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.
*या कामांचे होणार भूमिपूजन*
प्रभाग क्र. १६ मध्ये मुकाई चौक कृष्णा हॉटेल ते लोढा स्किमपर्यंत एक्सप्रेस हायवे लगतचा १२ मीटर डी.पी. सर्विस रस्ता विकसित करणे (भाग – १ व भाग – २) चे भूमिपूजन
बापदेव मंदिर येथील किवळे गावातील मुख्य रस्ता ते एक्सप्रेस हायवेपर्यंतचा सिंबायोसिस कॉलेजमागील १८ मीटर डी.पी. रस्ता विकसित करणेच्या कामाचे भूमिपूजन
प्रभाग क्र. १६ विकासनगर येथील मुख्य रस्ता डांबरीकरण करून विकसित करणेच्या कामाचे भूमिपूजन
गवळी माथा ते इंद्रायणीनगर चौक पर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीट स्केपिंग पद्धतीने विकसित करणेच्या कामाचे भूमिपूजन
पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांग नागरिकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून त्यांचे सामाजिक व आर्थिक जीवनचक्राचे मॅपिंग करणेचा शुभारंभ
………
*या कामांचे होणार लोकार्पण*
संत मदर टेरेसा उड्डाणपूलावरून चिंचवड बाजूकडे उतरण्यास व चढण्यास बांधण्यात आलेल्या लूप/रॅम्पचे लोकार्पण
पवना नदीवर थेरगाव प्र. क्र. ५० मध्ये प्रसुनधाम शेजारी १८ मीटर डी.पी. रस्त्यावरील उभारण्यात आलेल्या थेरगाव-चिंचवड पुलाचे लोकार्पण
अमृत योजने अंतर्गत उभारण्यात आलेल्या चिखली (१२ एमएलडी) व पिंपळे निलख (१५ एमएलडी) क्षमतेच्या मैलाशुद्धीकरण प्रकल्पांचे लोकार्पण
पिंपळे सौदागर येथे गिर्यारोहणासाठी उभारण्यात आलेल्या क्लायबिंग वॉलचे लोकार्पण
प्रभाग क्र. ४ दिघी येथे आरक्षण क्र. २/१२२ येथे बांधलेल्या शाळा इमारतीचे लोकार्पण
प्रभाग क्र. ३ चऱ्होली येथील चोविसावाडी येथील अग्निशमन केंद्र इमारतीचे लोकार्पण
भोसरी येथील प्रभाग क्र. ७, आरक्षण क्र. ४३० येथील प्राथमिक शाळा इमारतीचे लोकार्पण
थेरगाव व भोसरी रुग्णालयाचे मध्यवर्ती निर्जंतुकीकरण विभाग लोकार्पण
प्रभाग क्र. ५ मधील सखुबाई गबाजी गवळी उद्यान येथील बहुमजली वाहनतळ इमारतीचे उदघाटन










