ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवडमध्ये होणार आयएफएससी आशियाई क्लाइंबिंग चॅम्पियनशिप स्पर्धा

१ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर याकाळात आयोजन, १३ देशांतील २०० युवा खेळाडूंचा सहभाग

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका, इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशन (आयएमएफ) आणि महाराष्ट्र स्पोर्ट क्लाइंबिंग असोसिएशन (एमएससीए) यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात प्रथमच आयएफएससी आशियाई किड्स क्लाइंबिंग चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पिंपळे सौदागर येथील योगा पार्कमधील अत्याधुनिक स्पोर्ट क्लाइंबिंग कॉम्प्लेक्स येथे होणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

आयएफएससी आशियाई किड्स क्लाइंबिंग चॅम्पियनशिप २०२५ या स्पर्धेत १३ देशांतील सुमारे २०० खेळाडू सहभागी होणार असून, स्पीड क्लाइंबिंग, लीड क्लाइंबिंग आणि बोल्डरिंग या तीन थरारक प्रकारांमध्ये १३ आणि १५ वयोगटातील मुले-मुली आपले कौशल्य प्रदर्शित करतील. ही स्पर्धा प्रत्येक भिंतीवरील चढाई ही केवळ वेग आणि कौशल्याचीच नाही, तर मानसिक एकाग्रतेची आणि धैर्याचीही परीक्षा ठरणार आहे.

स्पर्धेचे परीक्षण आयएफएससी व आयएमएफ कडून नियुक्त आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय दर्जाचे स्पर्धाधिकारी करणार असल्यामुळे स्पर्धेतील सर्व निकष जागतिक दर्जाचे राहतील.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी मिशनच्या सहकार्याने उभारलेल्या अत्याधुनिक केंद्रात ही स्पर्धा पार पडणार असून हे केंद्र सध्या देशातील सर्वाधिक प्रगत क्रीडा सुविधांपैकी एक मानले जाते. अलीकडेच ऑक्टोबर २०२५ मध्ये पार पडलेल्या २९ व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लाइंबिंग चॅम्पियनशिपने या केंद्राची गुणवत्ता आणि एमएससीएच्या स्वयंसेवकांची तयारी सिद्ध केली आहे. या अनुभवावर आधारित, आशियाई चॅम्पियनशिपचे आयोजन अधिक दर्जेदार होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन हे शहरासाठी अभिमानाची बाब आहे. या स्पर्धेमुळे तरुण खेळाडूंना जागतिक दर्जाच्या खेळपट्टीवर आपले कौशल्य दाखविण्याची उत्तम संधी मिळणार आहे. नागरिकांनीही या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे.
— विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

या स्पर्धेमुळे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना एक अद्वितीय क्रीडा अनुभव मिळणार आहे. अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये साहस, शिस्त आणि आत्मविश्वास वाढीस लागतो. महापालिका क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यास कटिबद्ध आहे, आणि ही स्पर्धा त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.
— पंकज पाटील, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
…..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button