रस्त्यातील निकृष्ट दर्जाचे चेंबर्स जीवघेणे ठरत आहेत; केशवनगर परिसरात नागरिक त्रस्त

चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केशवनगर, विवेक वसाहत चौक, उद्यम विकास बँकेसमोर गेल्या दोन महिन्यांत तीन वेळा चेंबर बदलण्यात आले, तरीही आजही ते खराब अवस्थेत आहेत. पाच महिन्यांपूर्वी मोठ्या खर्चाने काम पूर्ण झाल्यानंतर देखील पुन्हा पुन्हा चेंबर खोलले जात आहेत. मुख्य रस्त्यावरील हे चेंबर्स हलक्या दर्जाचे असल्याने, मोठ्या वर्दळीच्या भागात नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा आरोप महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, चार दिवसांपासून तीनही चेंबर्स खराब अवस्थेत आहेत आणि दररोज 10 ते 15 दुचाकीस्वार अपघातग्रस्त होत आहेत. या चेंबर्समुळे लवकरच एखादी चारचाकी गाडी देखील त्यात अडकू शकते, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
मधुकर बच्चे यांनी यापूर्वी अनेक वेळा यासंबंधी पाठपुरावा केला असूनही कामाचा दर्जा खराबच राहिला आहे. त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, “तक्रारी करून देखील निष्कृष्ट दर्जाचे चेंबर्स बसवले जात आहेत. जबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई होत नसल्याने पालिकेचा पैसा वाया जातो आणि नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागते. प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अन्यथा पुढच्या वेळी नागरिकांकडून संबंधित अधिकाऱ्यांचे सामाजिक शासन होणार.”
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, संबंधित विभागाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.














