चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

केशवनगर चिंचवडमध्ये बेकायदेशीर कचरा डम्पिंगचा कहर; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ—कारवाई न झाल्यास ‘अनोखे आंदोलन’चा इशारा

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केशवनगर, चिंचवड येथील काकडे टाऊनशिप वसाहतीसमोर गेल्या तब्बल एक वर्षापासून बेकायदेशीरपणे घनकचरा, घाण, आरोग्यास अत्यंत हानिकारक माती, राडाराडा व रोढा राजरोसपणे टाकला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या अनधिकृत डम्पिंगमुळे परिसर अक्षरशः डम्पिंग ग्राउंडमध्ये रूपांतरित झाला असून, चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणात रहिवासी असतानाही हा गैरप्रकार उघडपणे सुरू आहे.

या कचऱ्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, अनेक रहिवाशांचे आरोग्य वारंवार बिघडत आहे. त्वचारोग, श्वसनाचे त्रास, ताप, डासांचा उपद्रव यासारख्या समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. या संदर्भात रहिवाशांनी वारंवार महापालिकेकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या बेकायदेशीर कचरा टाकण्यामागे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांचा आर्थिक हातभार असावा, अशी तीव्र शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांच्यासह स्थानिक रहिवाशांनी आज थेट घटनास्थळी भेट देत कचरा टाकणाऱ्या ट्रॅक्टर व डंपर चालकांना जाब विचारला. मात्र केवळ जाब विचारून प्रश्न सुटणार नसून, त्वरित दंडात्मक कारवाई होणे गरजेचे असल्याची ठाम भूमिका यावेळी नागरिकांनी घेतली.
जर हा प्रकार असाच सुरू राहिला तर परिसरात नागरिकांचा उद्रेक होणे अटळ असून, पुढील चार ते पाच दिवसांत महापालिकेने ठोस कार्यवाही केली नाही, तर सर्व रहिवाशांच्या वतीने त्या ठिकाणी ‘अनोखे आंदोलन’ छेडले जाईल, असा थेट इशारा देण्यात आला आहे.

सदर प्रकरणाची त्वरित दखल घेऊन संबंधित अधिकारी व महापालिका आयुक्तांनी घटनास्थळी कचरा टाकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, साचलेला सर्व राडाराडा तातडीने हटवावा तसेच भविष्यात या ठिकाणी कोणतेही आरोग्यास हानिकारक काम होणार नाही, याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी केशवनगर चिंचवडमधील संतप्त नागरिकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button