पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार नाट्यसंग्राम! ६४ वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा ३ नोव्हेंबरपासून

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा यंदा पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेची प्राथमिक फेरी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ३ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान पार पडणार आहे.
दररोज संध्याकाळी सात वाजता नाट्यप्रयोगांचे सादरीकरण होणार असून, या काळात प्रेक्षकांना दर्जेदार हौशी नाट्यकृतींचा आस्वाद घेता येणार आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही राज्यनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी सांगितले की, यंदा एकूण २६ हौशी नाट्यसंघ या प्राथमिक फेरीत सहभागी होत असून, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील अनेक नाट्यसंघ यातून आपल्या कलाकौशल्याची चमक दाखवणार आहेत.
हौशी रंगभूमीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या राज्यनाट्य स्पर्धेच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकारांना रंगभूमीवर येण्याची संधी मिळणार आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “या नाट्यप्रयोगांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवा आणि मराठी नाट्यसंस्कृतीचा गौरव जपावा.”




















