“चिखलीतील लघुद्योजकांचे पुनर्वसन व्हावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे निवेदन”

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली परिसरात झालेल्या निष्कासन कारवाईमुळे विस्थापित झालेल्या लघुद्योजकांचे पुनर्वसन चिखली येथेच विकसित औद्योगिक पार्कच्या माध्यमातून करण्यात यावे, तसेच त्यांना झालेल्या नुकसानीबाबत भरपाई पिंपरी चिंचवड महानगरपालिका व महाराष्ट्र शासनामार्फत मिळावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनाद्वारे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडेही लक्ष वेधण्यात आले. या निवेदनाची गंभीर दखल घेत, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ बैठक घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
या वेळी संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, शिवसेना पुणे जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले आणि संघटनेचे संचालक संजय सातव उपस्थित होते. उद्योजकांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रशासन व शासनाकडून लवकरच पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.














