सरकारने मराठा आंदोलकांसाठी तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध कराव्यात – युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठा आरक्षणासाठी आझाद मैदान, मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी आंदोलकांच्या आरोग्यासाठी तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड सचिव चंद्रशेखर अशोक जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात जाधव यांनी नमूद केले की, मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात राज्यभरातून आलेले हजारो आंदोलक जमले असून, या आंदोलनादरम्यान आंदोलकांना उष्माघात, रक्तदाब, श्वसनाचे त्रास यांसारख्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. यासाठी तातडीने त्यांच्यासाठी वैद्यकीय उपाययोजना आवश्यक आहेत.
यासंदर्भात जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या केल्या आहेत. यामध्ये आझाद मैदानात तात्पुरता वैद्यकीय कॅम्प स्थापन करावा, २४ तास कार्यरत राहतील असे डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ नेमावा, प्राथमिक उपचार साहित्य, औषधे आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करावीत, आकस्मिक रुग्णांसाठी ॲम्ब्युलन्स सेवा सज्ज ठेवावी, अशा मागण्या केल्या आहेत.
जाधव यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, हे आंदोलन शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने सुरू आहे. आंदोलकांचे आरोग्य आणि जीवित सुरक्षित राहणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती केली आहे.
या मागणीमुळे आंदोलनस्थळी वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली असून, सरकार सकारात्मक पावले उचलतील अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली आहे.















