“चंद्रकांत पाटील यांचा सूचक इशारा; आचारसंहिता लागण्याच्या चर्चांनी वेग पकडला”

आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी २० किंवा २२ डिसेंबरला आचारसंहिता लागेल, असा दावा भाजप नेते, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. इतर पक्षातील शहरातील जे माजी नगरसेवक भाजपमध्ये येऊ इच्छित आहेत. त्यांच्या नावावर अगोदर स्थानिक गाभा समितीचे (कोअर कमिटी) एकमत होईल. त्यांचे एकमत झालेली नावे पुढे प्रदेशकडे पाठवली जातील. तशी नावे काढण्याचे काम सुरु असल्याचेही चंद्रकांत पाटील सांगितले.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांची गुरुवारी पिंपळेसौदागर येथे बैठक घेतली. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, महापालिका निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, उमा खापरे, अमित गोरखे, प्रदेश सचिव राजेश पांडे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, शहर सरचिटणीस विकास डोळस, युवक अध्यक्ष दिनेश यादव यावेळी उपस्थित होते.
उमेदवार अर्ज आणि उमेदवारी निश्चितीबाबत चर्चा झाल्याचे सांगून मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, २० किंवा २२ डिसेंबरला महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागेल. आजपासून जो मागेल त्याला उमेदवारी अर्ज दिला जाईल. पुढील चार दिवस उमेदवारी अर्ज भरुन घेतले जातील. अर्ज देण्यासाठी कोणतेही शक्तीप्रदर्शन करायचे नाही. स्वत: इच्छुकाने पक्ष कार्यालयात येऊन अर्ज द्यावा. या अर्जांची छाननी केली जाईल. ते सर्व अर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठविले जातील.




















