झोपडपट्टीतील कार्यकर्त्याच्या घरी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील; पिंपरी चिंचवडच्या राजकारणात ‘जनसंपर्काचा नवा अध्याय’
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी पिंपरी चिंचवड शहरात दौरा करीत नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या. भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नियोजनानुसार झालेल्या या दौऱ्यात पिंपरी आणि चिंचवड विधानसभा क्षेत्रातील विविध भागांना भेट देण्यात आली. लवकरच भोसरी विधानसभा भेटीचे आयोजन करण्यात येणार आहे.
दौऱ्यादरम्यान झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, स्वच्छता व्यवस्था आणि आरोग्य विभागातील तक्रारी यांसह नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. चंद्रकांतदादांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देत शहराच्या वाढत्या गरजांनुसार वेळबद्ध उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
विशेष म्हणजे, एका सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या झोपडपट्टीतील घरात चंद्रकांतदादा भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. कॅबिनेट पातळीवरील नेत्याची अशी सरळ जनता संपर्काची पद्धत शहराच्या राजकीय संस्कृतीत चर्चेचा विषय ठरली आहे. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याचे प्रत्यक्ष पाहायला मिळाले.
या बैठकीत आमदार महेश लांडगे, आमदार शंकरशेठ जगताप, आमदार अमित गोरखे आणि आमदार उमा खापरे यांनी शहरातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात माहिती मांडत तातडीने तोडगा निघावा अशी मागणी केली. दादांनी प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त करीत नागरिकहितास प्राधान्य देण्याची अपेक्षा स्पष्ट केली.
दौऱ्याला जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, प्राधिकरण माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
पिंपरी चिंचवडच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हा दौरा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
