चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या तेजल यादवचा जिल्हा परिषद शालेय बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय क्रमांक

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही उत्तुंग कामगिरी करणाऱ्या चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनी तेजल यादव हिने नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद स्तरावरील शालेय बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
या स्पर्धेत अनेक शाळांमधील गुणवंत खेळाडूंमध्ये कठीण स्पर्धा असताना तेजलने आपली बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि चिकाटीच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली.
तिच्या या यशाबद्दल शाळेचे संचालक संदीप काटे यांनी आनंद व्यक्त करताना, “आमच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडाक्षेत्रातही सातत्याने चांगली कामगिरी करत शाळेचा लौकिक वाढवला आहे. तेजलने केलेली कामगिरी ही इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल,” असे मत व्यक्त केले.
शाळेच्या प्राचार्या सुविधा महाले यांनी तेजलचे अभिनंदन करत, “विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत क्रीडा क्षेत्रातही प्रगती साधावी, त्यासाठी शाळा नेहमीच प्रोत्साहन व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देते. तेजलची मेहनत आणि सातत्य यामुळेच तिला हे यश मिळाले आहे,” असे गौरवोद्गार काढले.
शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. मयुर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तेजलने ही कामगिरी साध्य केली. त्याचबरोबर जुनिअर कॉलेज च्या कॉर्डिंनेटर शर्वरी कट्टी, तेजल चे पालक हेही उपस्थित होते. तिच्या या यशामुळे शाळा, शिक्षकवृंद व विद्यार्थीमंडळामध्ये आनंदाचे वातावरण आहे.













