टाकाऊ वस्तूंमधून साकारलेला गणपती — केंब्रिज चॅम्प्स इंटरनॅशनल प्री-स्कूलच्या चिमुकल्यांची अनोखी कलाकृती

कृष्णानगर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) — केंब्रिज चॅम्प्स इंटरनॅशनल प्री-स्कूलच्या कृष्णानगर शाखेतील दोन ते सहा वर्ष वयोगटातील चिमुकल्यांनी आपल्या कलागुणांचा अद्वितीय आविष्कार घडवत, टाकाऊ वस्तूंपासून सुंदर गणपती बाप्पांची मूर्ती साकारली. शिक्षणासोबतच सर्जनशीलतेचा संगम साधत या लहानग्यांनी झाडू, रबर, काठ्या, बाहुल्या, कापूस, थर्माकोल यांसारख्या घरगुती फुकट आणि खराब झालेल्या वस्तूंमधून गणरायाची मनमोहक मूर्ती साकारली आहे.
या उपक्रमाचे आयोजन शाळेच्या परिसरात करण्यात आले होते, जिथे स्थानिक नागरिक आणि पालकांसाठी हा उपक्रम खुले ठेवण्यात आला होता. गणपती बाप्पाच्या या आगळ्यावेगळ्या दर्शनाचा सर्वांनी मनमुराद आनंद घेतला आणि मुलांच्या कल्पकतेचं भरभरून कौतुक केलं.
या प्रसंगी कृष्णानगर ब्रांचचे चेअरमन कीर्ती मारुती जाधव, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता. त्यांनीही चिमुकल्यांच्या कलेचं विशेष अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हा उपक्रम पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संदेश देतानाच, बालवयातील मुलांमध्ये सर्जनशीलता आणि कलेविषयी प्रेम जागवणारा ठरला आहे.














