पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांसाठी मोफत व सुरक्षित बस प्रवास सेवा – ‘आप’चा नवा उपक्रम

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आम आदमी पार्टी (आप) पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने शहरातील सर्व महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम जाहीर करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात PMPML आणि PMPL या दोन्ही सार्वजनिक बस सेवा महिलांसाठी पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.
या उपक्रमाची अधिकृत घोषणा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांनी केली असून, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की शहरातील सर्व भगिनींना शिक्षण, नोकरी तसेच दैनंदिन गरजांकरिता आता कोणताही खर्च न करता सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची हमी देण्यात येत आहे.
श्री. काळे यांनी सांगितले की, दिल्लीत आणि पंजाबमध्ये महिलांसाठी मोफत बससेवा राबवून आम आदमी पार्टीने मोठे यश संपादन केले आहे. त्याच अनुभवाच्या आधारे आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही हा उपक्रम राबवून महिलांना आर्थिक दिलासा तसेच प्रवासात सुरक्षिततेची हमी देण्यात येणार आहे.
या उपक्रमाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
सर्व महिलांसाठी PMPML व PMPL बससेवेत पूर्णतः मोफत प्रवास.
शिक्षण, नोकरी, वैद्यकीय गरजा व दैनंदिन कारणांसाठी सुलभ व विनामूल्य प्रवास.
सुरक्षित प्रवासासाठी विशेष नियोजन.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना.
महिलांसाठी सुरक्षित आणि मोफत प्रवास ही काळाची गरज आहे. या उपक्रमामुळे अनेक महिलांना स्वावलंबी होण्याची संधी मिळणार असून, त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ होईल, असा विश्वास आम आदमी पार्टीने व्यक्त केला आहे.








