ताज्या घडामोडीपिंपरी

माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी भव्य रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबिर

रहाटणी - तापकीर नगर प्रभागातील जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, त्रिभुवन यांचे आवाहन

Spread the love

 

रहाटणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  रहाटणी-तापकीर नगर प्रभागातील नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा सामाजिक बांधिलकी जोपासत भव्य रक्तदान शिबिर तसेच मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सांयकाळी ५ या वेळेत हे शिबिर छत्रपती चौक, रहाटणी लिंक रोड येथे भरविण्यात येणार आहे.
प्रसिद्ध एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाच्या सौजन्याने हे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून, यात डोळ्यांची संपूर्ण तपासणी, चष्म्याचे नंबर तपासणे, मोतीबिंदू व इतर डोळ्यांच्या आजारांचे निदान आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत. तज्ज्ञ नेत्रतज्ज्ञांची टीम नागरिकांची तपासणी करणार आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलांसाठी ही सुविधा विशेष उपयुक्त ठरणार आहे.

दुसरीकडे रक्तदान शिबिराला प्रभागातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन बाबासाहेब त्रिभुवन यांनी केले आहे. “माझा वाढदिवस हा केवळ वैयक्तिक उत्सव न राहता समाजातील गरजू रुग्णांसाठी रक्त उपलब्ध करून देण्याचा व डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संकल्प आहे,” असे ते म्हणाले.

रहाटणी-तापकीर नगर प्रभागातील नागरिकांनी या दोन्ही शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बाबासाहेब त्रिभुवन हे आपल्या प्रभागात आरोग्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असतात. यंदाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित या शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button