ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

जुने निष्ठावंत, महिला की तरुण चेहरा…कोणाला मिळणार भाजप शहराध्यक्ष पदाची संधी?

Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजपच्या विद्यमान शहराध्यक्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने नवीन शहराध्यक्ष निवडीच्या चर्चेला वेग आला आहे. विलास मडीगिरी, शत्रुघ्न काटे, अनुप मोरे, शैला मोळक यांना शहराध्यक्षपदी मिळणार का संधी अशी चर्चा सुरु आहे. नव्यांना संधी देतात का जुन्या निष्ठावान कार्यकर्त्याला बढती देतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शहराध्यक्षपदासाठी आतापर्यंत 8 इच्छुकांची नावे समोर आली आहेत. या इच्छुक उमेदवारांमध्ये जुन्या आणि नव्या पदाधिकाऱ्यांत स्पर्धा आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, नामदेव ढाके, विलास मडिगिरी, अनुप मोरे, भीमा बोबडे, शैला मोळक यांच्या नावांची चर्चा आहे. तर नवीन पदाधिकाऱ्यांमध्ये विद्यमान शहर कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, विजय फुगे इच्छुक आहेत.
भारतीय जनता पक्षाचा शहराध्यक्ष होण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये 4 आमदारांच्या गटांनी तगडी फिल्डिंग लावली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हे पद महत्त्वाचे असल्याने शहराध्यक्षपदासाठी पक्षातील जुन्या व नवीन पदाधिकाऱ्यांत रस्सीखेच आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आलेल्या आठ नवीन निकषांनुसार शहराध्यक्षाची निवड होणार आहे.
यंदा तरी किमान जुन्या फळीतील नेत्याला संधी द्यावी अशी मागणी होत आहे.  आतापर्यंत भाजपच्या शहराध्यक्षपदी महिलेची वर्णी लागलेली नाही.त्यामुळे यावेळी तिला तेथे संधी द्यावी,असा दुसरा मतप्रवाह शहरात आहे.परंतू,आगामी महापालिकेची निवडणूक ध्यानात घेऊनच नवीन अध्यक्ष निवडला जाणार,हे मात्र नक्की.या निकषावर कोण खऱा उतरणार हे पाहून त्याची या पदी निवड होईल.
आठ निकषांनुसार होणार निवड :
– अनुशासित व प्रामाणिक व्यवहार असलेला इच्छुक उमेदवार असावा
– इच्छुक उमेदवार पक्षातील अनुभवी कायकर्ता असावा
– त्या उमेदवाराने यापूर्वी संघटनेच्या जबाबदारीच्या पदावर काम केलेले असावे
– इच्छुक उमेदवार हा किमान दोन टर्म सक्रिय सदस्य असलाच पाहिजे
– नवीन पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्याचा शहर-जिल्हाध्यक्ष पदासाठी विचार केला जाणार नाही
– इच्छुक उमेदवार आमदार, खासदार नसावा
– महिला, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) यांचे नाव खालून आलेच पाहिजे
– शहर-जिल्हा अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार 45 ते 60 वयोगटातील असावा.
पक्षाच्या वतीने या निवडणुकीसाठी पुणे जिल्हा निरीक्षक म्हणून खासदार धनंजय महाडीक, पर्यवक्षक म्हणून आमदार सिद्धार्थ शिरोळे व प्रदेश चिटणीस वर्षा डहाळे यांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. 30 एप्रिल रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे प्रदेशाध्यक्षंसह राज्यातील सर्व शहर-जिल्हा अध्यक्षांची घोषणा केली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button