चिंचवडताज्या घडामोडीपिंपरीसांस्कृतिक
सुरेश भट यांच्या पश्चातही गझल चळवळ वृद्धिंगत झाली! – बदीऊज्जमा बिराजदार

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सुरेश भट यांनी तन, मन, धन अर्पून मराठीत गझल चळवळ रुजवली; आणि त्यांच्या पश्चातही ही चळवळ वृद्धिंगत झाली!’ असे विचार ज्येष्ठ गझलकार बदीऊज्जमा बिराजदार उर्फ साबीर सोलापुरी यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, पिंपरी येथे (रविवार, दिनांक ०७ डिसेंबर) व्यक्त केले.
गझलपुष्प कला, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक संस्थेच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बदीऊज्जमा बिराजदार बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते संतोष कलाटे, उद्योजक सन्जॉय चौधरी, डॉ. अविनाश गारगोटे, रीमा शिशिर रंजन, ज्येष्ठ गझलकार प्रमोद खराडे, महाराष्ट्र पत्रकारसंघ प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, गझलपुष्पचे अध्यक्ष संदीप जाधव, सल्लागार नंदकुमार मुरडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी पंढरपूर येथील ज्येष्ठ गझलकार वैभव वसंत कुलकर्णी उर्फ वैवकु यांना ‘गझलपुष्प मराठी गझल प्रचार – प्रसार पुरस्कार २०२५’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी बदीऊज्जमा बिराजदार पुढे म्हणाले की, ‘मराठी गझल आता आशयविषयांसह बहुआयामी झाली असून त्यासाठी ‘गझलपुष्प’सारख्या विविध संस्थांचे मौलिक योगदान आहे. त्यामुळे गझलपुष्प पुरस्कार हा दर्जेदार मानला जातो!’ वैभव कुलकर्णी यांनी, ‘स्वतःची गझल समृद्ध व्हावी यासाठी मी गझलव्यासंग जोपासला; पण त्याचवेळी अन्य गझलकारांच्या गझला निर्दोष व्हाव्यात म्हणूनही प्रयत्न केले याचे समाधान वाटते!’ अशी भावना व्यक्त केली. नंदकुमार मुरडे यांनी प्रास्ताविकातून, ‘हेतू निर्मळ असेल तर समाज त्या कार्याची दखल घेतो, याचा प्रत्यय गझलपुष्प संस्थेला सात वर्षांच्या काळात सातत्याने येत आहे!’ असे सांगून संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. प्रमोद खराडे यांनी, ‘लेखणी आणि नांगर या दोनच गोष्टी भविष्यात आपल्याला तारू शकतील!’ असे मत मांडले; तर गोविंद वाकडे यांनी, ‘सांस्कृतिक कार्यक्रमांचा झरा अविरत सुरू राहिला तर सामाजिक असमतोल दूर होईल!’ असा विश्वास व्यक्त केला. मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय गझललेखन स्पर्धेतील महेश मोरे (सातारा), सुप्रिया हळबे (ठाणे) आणि राहुल कुलकर्णी (धुळे) या अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आलीत.
गझलसंवाद या सत्रात अकोला येथील ज्येष्ठ गझल अभ्यासक शिवाजी जवरे यांच्याशी प्रमोद खराडे आणि प्रफुल्ल कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रा. दिनेश भोसले यांनी मुलाखतीच्या माध्यमातून सुसंवाद साधला. गझल आणि कविता, गझलेतील शब्द आणि संगीत यांचे महत्त्व, गझलेतील इंग्रजी शब्दांचा शिरकाव, गझललेखनातील स्वानुभव आणि कल्पनाविलास, सुरेश भट यांच्यानंतर मराठी गझल संपली का? अशा गझलकार आणि रसिक यांच्या मनात निर्माण होणाऱ्या विविध
शंकांचे परखडपणे निरसन करताना शिवाजी जवरे यांनी, ‘मराठीत नवोदित गझलकार अतिशय उत्तम लिहीत असून हा प्रवाह कोणीही थोपवू शकत नाही!’ अशी ग्वाही दिली.
दिवसभरात एकूण तीन मराठी गझल मुशायरा घेण्यात आले. त्यामध्ये बदीऊज्जमा बिराजदार, हेमंत राजाराम, नंदकुमार मुरडे, प्रदीप तळेकर, संजय खोत, मीना शिंदे, अविनाश धोंगटे, हेमंत जोशी, वैभव कुलकर्णी, महेश मोरे, आदेश कोळेकर, गणेश भुते, भूषण अहिर, सारिका माकोडे, सुहास घुमरे, संदीप जाधव, राहुल कुलकर्णी, विशाल राजगुरू, सुप्रिया हळबे, प्रशांत पोरे, रेखा कुलकर्णी, नीलेश शेंबेकर, दिनेश भोसले, सरोज चौधरी आणि अभिजित काळे यांनी वैविध्यपूर्ण गझलांचे सुंदर सादरीकरण करीत उत्स्फूर्त दाद मिळवली. प्रा. दिनेश भोसले यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.



















