मानवतेला धर्माच्या साच्यात बसवू नका – भारद्वाज
दिवाळीनिमित्त सजग कार्यकर्त्यांसमवेत चिंतनशील संवाद

चांगला दृष्टीकोन, इच्छाशक्तीला कृतीशीलतेची जोड हवी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मानवता मनुष्याचा विवेक आहे. त्यामुळे मानवतेला धर्माच्या साच्यात बसवू नका, असे आवाहन थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्यसिद्धांताचे जनक आणि रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी पिंपरीत बोलताना व्यक्त केले. समाजात चांगले बदल घडवण्यासाठी दृष्टीकोन हवाच. त्याचप्रमाणे इच्छाशक्तीला कृतीशीलतेची जोड आवश्यक आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
जनकार्य मंच या संस्थेच्या वतीने दिवाळीनिमित्त शहरातील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते एकत्र आणून त्यांच्यात चिंतनशील संवादाचे आयोजन करण्यात आले, तेव्हा ते बोलत होते.
अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव पृथ्वीराज साठे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी जनकार्य मंचाचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पुरोगामी चळवळीचे नेते मानव कांबळे, मारुती भापकर, अशोक मोरे, सुरज कुलकर्णी, मनोज कांबळे, धम्मराज साळवे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण कदम मंगेश चव्हाण, छावा संघटनेचे विष्णू बिरादार, निखिल भोईर, प्रदीप पवार, ओबीसी नेते सुधाकर कुंभार, गांधीवादी विचारवंत बी.आर. माडगूळकर, सोनल बुंदेले, शिल्पा गायकवाड, अश्विनी कांबळे, सूरज गायकवाड, अविनाश चौधरी, कमलेश वाळके, हिराचंद जाधव, सदाशिव तळेकर, युनुस बागवान, स्वप्नील बनसोडे, रोहित भाट आदींसह भारद्वाज यांचे सहकारी रंगकर्मी अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के उपस्थित होते.
संवादाचा अर्थ सदविवेक, बुद्धी, दृष्टी, संप्रेषण. जिथे समाजाचे चिंतन संपते तिथे समाज आत्मघाती होतो, असे संवादाचे महत्व सांगून भारद्वाज म्हणाले की, राजनैतिक चिंतनाची प्रतिबद्धता हीच आजच्या समाजाची खरी आवश्यकता आहे. राजकारण हे केवळ सत्तेचे माध्यम नाही. तर ती प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी जोडलेली जबाबदारी आहे. तसेच सत्याचा पथ साधण्याची साधना आहे, आपण व्यवस्थेला जशी आहे तशी स्वीकारतो आणि म्हणतो की व्यवस्था बदलत नाही.
आज भारतात देवधर्म पीठ मंदिर मशिदी आणि चर्च यासाठी आहेत कारण भारतामध्ये व्यवस्थेचा आधार जनतेला राहिलेला नाही आपल्याला त्या व्यवस्थेचा आधार बनायचा आहे.
बदल घडवणारे माहोल बघत नाही तर बदल घडवणारे माहोल निर्माण करतात, आज गरज आहे जनतेच्या आक्रोशाला बुद्धीने चॅनेलाईज करण्याची असेही ते म्हणाले.
यावेळी भारद्वाज यांनी उपस्थितांच्या विविध प्रश्नांना उत्तरेही दिली.
तत्पूर्वी पृथ्वीराज साठे, मारुती भापकर, मानव कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे आयोजन जनकार्य मंचाचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी केले.













