कुदळवाडीतील बालघरे वस्ती येथे पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिकारी व नागरिकांची महत्वपूर्ण बैठक

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुदळवाडीतील बालघरे वस्ती येथे पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी प्रितम बाविस्कर आणि स्थानिक लोकप्रतिनिधी दिनेश यादव यांच्या उपस्थितीत एक महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली.
या भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अनियमित व अपुरा पाणीपुरवठ्यामुळे नागरिक, विशेषतः महिलावर्ग, त्रस्त झाला होता. त्यामुळे समस्या समजून घेण्यासाठी आणि तातडीने उपाययोजना करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीस मोठ्या संख्येने महिला नागरिक उपस्थित होत्या. त्यांनी थेट अधिकाऱ्यांपुढे आपल्याला भेडसावणाऱ्या समस्या स्पष्टपणे मांडल्या. यामध्ये वेळेवर पाणी न मिळणे, कमी दाबाने येणारे पाणी, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, तसेच टँकर सेवा असमाधानकारक असणे यासारख्या गंभीर मुद्द्यांचा समावेश होता.
बैठकीतील प्रमुख मुद्दे:
नियमित व वेळेवर पाणी पुरवठा
वारंवार होणाऱ्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय
पाईपलाइनमधील बिघाडाचे तत्काळ निराकरण
पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी व उपाय
अधिकारी प्रितम बाविस्कर यांनी महिलांच्या सर्व तक्रारी लक्षपूर्वक ऐकून घेतल्या आणि तात्काळ उपाययोजना केली जातील, असे आश्वासन दिले.
लोकप्रतिनिधी दिनेश यादव यांनी प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवादाचे महत्त्व अधोरेखित केले आणि भविष्यात अशा संवादात्मक बैठका अधिक नियमितपणे घेण्याचे आश्वासन दिले.
बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली आणि त्यातून प्रशासन व नागरिकांमधील परस्पर विश्वास अधिक दृढ झाला.













