“बाबू नायर यांची प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी फेरनियुक्ती”

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी स्वीकृत सदस्य बाबू नायर यांची पुन्हा एकदा प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आल इंडिया काँग्रेस कमिटीने त्यांना नियुक्तीपत्र नुकतेच प्रदान केले असून, ही बाब शहर काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
बाबू नायर हे काँग्रेस पक्षाशी १९८० पासून सक्रियपणे जोडले गेले आहेत. त्यांचा राजकीय प्रवास एनएसयूआयपासून सुरू झाला असून, युवक काँग्रेसमध्ये शहर सरचिटणीस, सेवादल शहराध्यक्ष, शहर प्रवक्ते, प्रदेश प्रतिनिधी अशी विविध पदे त्यांनी भूषवली. पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या नऊ शहराध्यक्षांबरोबर त्यांनी कार्य केले आहे.
महापालिकेत दोन वेळा स्वीकृत सदस्य म्हणून त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. २०१० ते २०१२ या काळात राज्यातील प्रथम स्थायी समिती सदस्य म्हणून निवड होण्याचा मानही त्यांना मिळाला होता. महापालिकेच्या शहर सुधारणा आणि क्रीडा समित्यांमध्ये त्यांनी महत्त्वाचे काम केले.
२०१४ साली त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेथील कार्यकाळात त्यांनी शहर सरचिटणीस म्हणून संघटनात्मक बांधणी केली. आमदार महेश लांडगे यांच्या निवडणूक प्रचार प्रमुखाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली होती. त्याचप्रमाणे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचेही ते निकटवर्ती समजले जात होते.
मात्र, २०२२ मध्ये त्यांनी भाजपला रामराम ठोकून पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली त्यांना पुन्हा एकदा सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा काँग्रेस पक्षाला आगामी काळात मोठा फायदा होणार असल्याचे पक्षातील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.














