रहाटणी – तापकीर नगर प्रभागातील पाणीपुरवठा समस्येवर तात्काळ उपाययोजना करण्याच्या प्रशासनाला सूचना!

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेल्या काही दिवसांपासून रहाटणी – तापकीर नगरमधील शास्त्री नगर, दत्त नगर, नाखते वस्ती, शिवराज नगर, सज्जनगड कॉलनी, पवना नगर रहाटणी आणि तपकीर नगर या भागांमध्ये पाणीपुरवठा अनियमित आहे. सकाळ-संध्याकाळी कमी दाबामुळे किंवा पाणीच न मिळाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या समस्येची दखल घेत आज माझ्या जनसंपर्क कार्यालयात महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यात उपअभियंता ऋषिकेश गेंगजे, जूनियर इंजिनियर समीक्षा मालपुरे, कर्मचारी मुकेश भुजबळ आणि शेखर साठे उपस्थित होते.
समस्यांचे मूळ शोधून तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. “सध्या दिवाळी सणाची धामधूम असून ऐन सणामध्ये पाणीप्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांची विशेषतः महिला वर्गाची गैरसोय होत आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी ही समस्या मार्गी लावावी” असेही त्यांना सांगितले.
संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर ही समस्या मार्गी लावून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले.













