सामाजिक कार्याप्रति संवेदनशीलता समाजासाठी प्रेरक! – बबन पोतदार

पिंपरी (दिनांक : १८ ऑगस्ट २०२५) ‘रोडे परिवाराची सामाजिक कार्याप्रति संवेदनशीलता ही समाजासाठी प्रेरक ठरेल!’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक बबन पोतदार यांनी क्लब हाऊस, प्रिस्टीन प्रोलाईफ सोसायटी, वाकड येथे काढले.
सेवानिवृत्त प्राचार्य, ज्येष्ठ पत्रकार, चित्रकार, कवी आणि सामाजिक कार्यकर्ते कै. रा. ना. तथा दिनेश रोडे यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त रोडे परिवाराच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांचे संगोपन आणि शिक्षण देणाऱ्या आळंदी जवळील स्नेहवन या संस्थेचे संचालक अशोक देशमाने यांना सन्मानित करताना बबन पोतदार बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच ह. भ. प. दत्तात्रयमहाराज दीक्षित, साहित्यिक नारायण कुंभार, डॉ. अतुल रोडे, उद्धव रोडे, छायादेवी रोडे, विजया पोतदार, अशोकमहाराज गोरे यांच्यासह पिंपरी – चिंचवड, पुणे आणि पंचक्रोशीतील विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यिक, आप्तेष्ट, मित्रपरिवार यांची
सभागृहात उपस्थिती होती.
स्मृतिचिन्ह, रोख रुपये अकरा हजार, शाल, श्रीफळ, ग्रंथ आणि गुलाबपुष्प असे सन्मानाचे स्वरूप होते. बबन पोतदार पुढे म्हणाले की, ‘दिनेश रोडे हे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या स्मृती जतन करताना स्नेहवन यासारख्या सामाजिक जाणिवेतून कार्य करणाऱ्या संस्थांना अर्थसाहाय्य करून सन्मानित करणे निश्चितच कौतुकास्पद आहे.’
याप्रसंगी नारायण कुंभार यांनी कै. रोडे यांच्या कलाजाणिवांची समीक्षा केली; तर दत्तात्रयमहाराज दीक्षित यांनी आशीर्वचनपर भाष्य केले. जयंती रोडे-बनकर, पृथ्वीराज रोडे, नितीन बनकर, सुप्रिया ढगे, गणेश ढगे, जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबले यांनी मनोगते व्यक्त केलीत. अंबादास रोडे यांनी प्रास्ताविकातून दिनेश रोडे यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर भाष्य करीत हृद्य आठवणींना उजाळा दिला. सत्काराला उत्तर देताना अशोक देशमाने यांनी, ‘अनाथ आणि गरिबीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना शिक्षित करणे एवढेच ‘स्नेहवन’चे उद्दिष्ट नसून त्यांना चारित्र्यसंपन्न नागरिक बनविणे हे आमचे ध्येय आहे!’ असे कृतज्ञतापूर्वक मत व्यक्त केले. सुरेश कंक यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ”जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला!’ हा दैवी संकेत असल्याने मानव हतबल आहे. कै. रा. ना. रोडे यांच्या आठवणी आणि कार्य ग्रंथरूपात जतन करण्यात यावे!’ अशी अपेक्षा व्यक्त केली. दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. संजय गमे यांनी अभंग सादर केला. धनंजय रोडे, सत्यम रोडे, सुप्रिया ढगे, भक्ती रोडे, दयानंद कुंभार, मुरलीधर दळवी आणि रोडे परिवार यांनी संयोजन केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. शुभांगी शिंदे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.













